औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ शृंगी घुबड जखमी अवस्थेत आढळून आले. एका झाडावर मांजामुळे हे घुबड अटकले होते. त्यात घुबड जखमी झाले होते. पक्षीमित्रांच्या साह्याने जखमी घुबडावर उपचार करण्यात आले असून लवकरच त्याची मुक्तता करण्यात येणार आहे.
विद्यापीठ परिसरातील एका झाडावर पतंगाचा मांजा अडकला होता. या मांज्यातच शृंगी घुबड अडकले होते. घुबडाच्या पंखात मांजा गुंतला होता. त्यामुळे घुबड झाडाला लटकले होते. या परिस्थितीत घुबडाला पाहून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी पक्षी मित्र नितेश जाधव यांच्याशी संपर्क साधला. जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घुबडाची मांजा पासून सुटका केली. त्याच्या पंखाला जखम झाली होती. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने घुबडाच्या पंखावर उपचार करण्यात आले. आणखी चार ते पाच दिवस घुबडावर उपचार करण्यात येतील आणि त्यानंतर त्याची मुक्तता केली जाईल अशी माहिती पक्षी मित्र नितेश जाधव यांनी दिली.
जनजागृतीमुळे यंदा नायलॉन मांजाचा वापर झाला कमी-
दरवर्षीच्या मानाने यंदा नायलॉन मांजाचा वापर कमी प्रमाणात झाला आहे. नायलॉन मांजावर बंदी असूनही गेल्या काही वर्षात मांजा वापरणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र यंदा फरक पडल्याने पक्षी कमी प्रमाणात जखमी झाले आहेत. मांजा विषयी केलेली जनजागृती आणि पोलिसांमार्फत करण्यात आलेली जप्तीची कारवाई, यामुळे हा फरक पडला आहे. आतापर्यंत 45 जखमी पक्ष्यांना उपचार देण्यात आल्याची माहिती पक्षी मित्र नितेश जाधव यांनी दिली..
हेही वाचा- जाणून घ्या, आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाचे मुद्दे