औरंगाबाद - नायलॉन मांजावर बंदी आहे. तरी देखील बुड्डी लेन परिसरातील जुना बाजार येथील पतंग विक्रीच्या दुकानात खुलेआम नायलॉन मांजाची विक्री केली जात होती. पोलिसांनी या दुकानावर छापा टाकला. दरम्यान, दुकानात २७०० रुपयाचा नायलॉन मांजा आढळून आला. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेजासिंग संजयसिंग राजपुत (२४ वर्षे) असे गुन्हा दाखल झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे.
नायलॉन मांजा जीवघेणा-
तरुणांमध्ये नायलॉन मांजाची क्रेझ आहे. या मांजामुळे पतंग लवकर कटत नसल्याचा अनेक तरूणांमध्ये समज आहे. यामुळे या नायलॉन मांजाला सर्वाधिक पसंती असल्याचे अनेक तरुणांनी सांगितले. मात्र या नायलॉन मांजाच्या काटाकाटीमध्ये पतंग उडविणाऱ्याच्या हाताला जखम होतात. काटलेला पतंगाचा मांजा रोडवर पडल्यास त्यामध्ये लहान मुले , वाहन धारक, पादचारी अडकून अपघात होण्याची शक्यता आहे.
नायलॉन मांजा आल्याने अनेकांच्या गळा कापला गेलाचा प्रकार गेल्यावर्षी शहरात घडला होता. तसेच पक्ष्यांसाठी सुद्धा हा मांजा धोकादायक आहे. यात पक्षी अडकल्यास त्याची त्यातून सुटका होत नाही. अनेक पक्षांचा यात जीव जातो. मांजा विद्युत तारेवर पडल्यास शॉर्ट सर्कीट होण्याची शक्यता असते.
संक्रांत जवळ आल्याने पतंग विक्रीला सुरुवात-
मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पूर्वीपासून शहरात पतंगप्रेमींची संख्या प्रचंड आहे. यामध्ये राजकीय नेते अधिकारी तरुण-तरुणी यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. शहरातील विविध भागातील पतंग प्रेमींनी महिनाभर अगोदरपासूनच पतंग उडवायला सुरुवात केली आहे. यासाठी लागणारे रंगबेरंगी पतंग शहरातील विविध भागात उपलब्ध झाले आहेत. यातील बुढी लेन, बेगमपुरा, औरंगपुरा, गुलमंडी, पाडेगाव, हर्सूल, पदमपुरा, क्रांती नगर, सिडको, हडको, टी वी.सेंटर यासह शहरातील विविध ठिकाणी पतंग विक्रीचे दुकान थाटले आहे.
नागरिकांसह पतंग विक्रेत्यांना पोलिसांचे आवाहन-
नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी असल्यामुळे शहरातील पतंग विक्रेत्यांनी नायलॉन मांजा स्वतः जवळ बाळगु नये, खरेदी विक्री करु नये. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची पोलीस स्टेशनव्दारे माहिती घेण्यात येत आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली.
हेही वाचा- Breaking News : सीरमच्या कोरोना लसीला सशर्त मान्यता