औरंगाबाद - राज्यात कामगार ब्युरो सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. राज्य सरकार, कामगार , कौशल्य विकास यांचा सहभाग घेऊन हे केलं जाईल. कुशल, अर्धकुशल, पूर्ण कुशल असे वर्गीकरण कामगारांचे केलं जाईल आणि नवीन उद्योजकांना लागेल त्यावेळी मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ अस सुभाष देसाई यांनी औरंगाबादला सांगितलं.
औरंगाबादचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादेत आढावा बैठक घेतली. कोविड 19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी चिकलठाणा परिसरात मेलट्रॉन येथील जागेची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली.
उद्योगांबाबत राज्यात आतापर्यंत 64493 उद्योगांना परवानगी दिली आहे त्यापैकी 34 हजारावर उद्योग सुरू झाले असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली. यातून 10 लाख लोकांचे रोजगार सुरू झाले आहेत, असे सांगत अर्थचक्राला चालना देण्याचा प्रयत्न सुरुय असे देसाई म्हणाले. काल पंतप्रधान यांनी पॅकेज जाहीर केले आहे, त्याचा फायदा होईलच, मात्र राज्य सरकार सुद्धा याबाबत विचार करत आहे. आम्हीही पॅकेज जाहीर करण्याबाबत विचार करतोय, असं देसाई म्हणाले. इतकच नाही तर ज्यांना नव्याने उद्योग सुरू करायचे आहेत त्यांनी मजबूत प्रपोजल द्यावे त्यांना तात्काळ महापरवाना मिळेल, उर्वरित परवानगी त्यांनी 3 वर्षात घ्यावी, असे देसाई म्हणाले. तर मजूर जाताय ते वाईट आहे. मात्र यामुळं राज्यातील लोकांना संधी आहे. त्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.
येत्या महिनाभरात औरंगाबादच्या चिखलठाणा परिसरात 250 खाटा असलेले कोविड हॉस्पिटल उभारण्यात येईल, अशी घोषणा औरंगाबाद पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली. शहरात 55 वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे, महापालिकेने 12 कंटेन्मेंट झोन निर्माण केले आहेत, काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले. यापुढे औरंगाबादेत बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. संचारबंदी कडक असेल, पोलीस अगदी गल्ली पोलिसिंग सुद्धा करतील असे सांगत गरज पडल्यास आता औरंगाबादेत एसआरपीएफ तैनात करण्यात येईल असा इशारा सुभाष देसाई यांनी दिलाय. शहरात आतापर्यंत 216 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याचंही देसाई म्हणाले.