औरंगाबाद - रत्नागिरी येथून आंब्याचे २ लाख ५८ हजार रुपये मागण्यासाठी आलेल्या एका महिलेला जिल्हा क्रीडा अधिकारी कविता सुभाष नावंदे यांनी विभागीय क्रीडा संकुलात मारहाण केली. ही घटना सोमवारी घडली असून, यात नावंदे यांच्याविरोधात जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथील विद्यार्थिनीला विक्रीसाठी आंबे मागवले, मात्र त्याचे पैसे मात्र दिलेच नाही. यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या तक्रारीवरून रत्नागिरीतील दोघींच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलिसांनी दिली.
२००८ मध्ये कविता नावंदे या रत्नागिरी येथे क्रीडा अधिकारी होत्या. त्यावेळी तक्रारदार १२ वीच्या वर्गात शिकत होत्या. खेळामुळे दोघींची ओळख झाली. मार्च २०२० मध्ये नावंदे यांनी फोनद्वारे पवार यांना हापूस आंब्याचा व्यवसाय करायचा असून, हापूस आंबे मिळवून देण्याची मागणी केली. पवार यांनी इतरांकडून ३०० हापूस आंब्यांच्या पेट्या नावंदे यांच्याकडे पाठविल्या. या व्यवहारातील काही पैसे दिल्यानंतर उर्वरित २ लाख ५८ हजार रुपये त्या देत नव्हत्या.
आंब्याचे पैसे मागितल्याने केली मारहाण
मोबाइल फोनही उचलत नसल्यामुळे बहिणीला सोबत घेऊन औरंगाबादेत सोमवारी आले असल्याचे पवार यांनी सांगितले. नावंदे यांच्या विभागीय क्रीडा संकुलातील कार्यालयात सायंकाळी आंब्याचे पैसे मागितले. तेव्हा नावंदे यांनी पवार यांना माझा तुझा काही संबंध नाही. मी तुला ओळखतही नाही', असे सांगितले. तेव्हा मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. कविता नावंदे यांनीही सुप्रिया पवार व त्यांच्या बहिणीच्या विरोधात तक्रार दाखल केली. शिवीगाळ, धमकी देण्याचा गुन्हा नोंदविल्याचे पोलीस अधिकारी वाघ यांनी सांगितले.
हेही वाचा - हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरला जाताना अडवून दाखवावे- किरीट सोमैय्या