औरंगाबाद - पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिसाच्या पतीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नक्षत्रवाडी परिसर येथे घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नक्षत्रवाडी परिसरात राहणाऱ्या दिलीप रामकिसन गवळी (४०) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. दिलीप गवळी हे किराणा दुकान चालवत होते. त्यांच्या पत्नी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात हवालदार आहे. या दांपत्याला दोन मुली आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप काही दिवसांपासून तणावात होते. शुक्रवारी ते आई- वडिलांकडे गेले आणि तिथेच घरात पहाटेच्या सुमारास गळफास घेतला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी दिलीप यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
हेही वाचा, आरोप धक्कादायक, गृहमंत्री अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा; फडणवीसांची मागणी
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
दिलीप यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घाटीत जाऊन नातेवाईकांची समजूत घालून कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.