औरंगाबाद - पाकिस्तानच्या कारागृहात 18 वर्ष राहिलेल्या 65 वर्षीय हसीना दिलशाद अहमद भारतात परत आल्यावर त्यांचं घर माफियांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मायदेशी परतल्यावरही महिलेची फरफट झाली आहे. हसीना यांनी न्यायासाठी पोलिसात धाव घेतली आहे.
हसीना दिलशाद अहमद यांनी जुलै 2000 साली औरंगाबादच्या रशीदपुरा येथे जमीन घेत बांधकाम केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्या पाकिस्तानला आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्या. तिथे त्यांचा पासपोर्ट हरवला आणि पाकिस्तान सरकारने त्यांना गुप्तहेर म्हणून कारागृहात टाकले. औरंगाबाद पोलिसांनी ही महिला औरंगाबादची रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिच्या मालकीच्या घराचे कागदपत्र शोधून ते भारतीय दूतावासात मार्फत पाकिस्तानला पाठवले होते. त्यावेळी याच घरांच्या कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानने महिलेला सोडले होते.
महिलेने अठरा वर्षे काढली पाकिस्तानच्या कारागृहात-
पाकिस्तानला आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या हसीना यांची कागदपत्र चोरीला गेली. त्यानंतर त्या कराचीमध्ये रस्त्यांवर भटकत राहिल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती. चौकशीमध्ये त्यांनी सर्व सत्यता पाकिस्तानी पोलिसांना सांगूनही त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांना ताब्यात घेऊन कारागृहात टाकण्यात आले. त्या निर्दोष असल्याचा पुरावा त्यावेळेस देऊ न शकल्यामुळे अठरा वर्ष त्यांना पाकिस्तानच्या कारागृहात काढावी लागली. यादरम्यान पोलिसांनी त्यांचा भारतीय गुप्तहेर समजून छळ केला. अनेकवेळा त्यांना त्रासही सहन करावा लागला. मात्र अठरा वर्षानंतर अखेर पाकिस्तानमधून त्यांची सुटका झाली.
माझं घर मला परत द्या-
हसीना दिलशाद अहमद यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट घेतली. रशिद पुरा भागात माझं जुनं घर होतं. हे घर भूखंड माफियांनी हडपले आहे. रशीदपुरा येथील घर मुस्ताक अहमद या इसमाने बळकावून जुने घर पाडून त्यावर दुमजली इमारत बांधली आहे. घर बळकावल्याच दिसताच हसीना बेगम यांचा संताप झाला. त्यावर हाफिज मुस्ताक त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत काय करायचं ते करून घे, असं सांगितल्याचा आरोप हसीना यांनी केला आहे. पोलीस मला न्याय देतील, असा विश्वास हसीना यांनी व्यक्त केला.
2002 मध्ये गेल्या होत्या पाकिस्तानात
हसीना यांचा विवाह उत्तर प्रदेशातील सहारनपूर नबाब का किला येथील दिलशाद अहमद यांच्याशी झाला होता. यानंतर त्या 2002 मध्ये पाकिस्तानातील नातेवाईकांना भेटण्यासाठी लाहोरला गेल्या होत्या. मात्र ते नातेवाईक त्यांना भेटलेच नाही. यानंतर त्या लाहोर शहरात भटकत राहिल्या. याच दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरविला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना संशयित घोषित करून तुरुंगात टाकले. आता तब्बल 18 वर्षांनी त्यांची सुटका झाली आहे.
20 डिसेंबरला झाली सुटका
हसीना यांची 20 डिसेंबर रोजी पाकिस्तानातील तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर त्या अमृतसरमध्ये दाखल झाल्या. येथील गुरू नानकदेव रुग्णालयाच्या धर्मशाळेत त्या मुक्कामाला होत्या. यानंतर अमृतसर पोलिसांनी हसीना यांच्याकडून माहिती घेत त्यांचे भाचे जैनुद्दीन चिश्ती यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना औरंगाबादला पोहोचविले.