औरंगाबाद - जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांची भारत जगभरात प्रसिद्धी करण्यात कमी पडला आहे, अशी खंत इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांनी व्यक्त केली. या लेण्यांचा इतिहास शालेय- विद्यापीठच्या अभ्यासक्रमात सामील करावा, अशी त्यांनी मागणी केली. मानवी कलाकृतीचा अजोड नमुना असलेल्या अंजिठा लेण्यांच्या शोधाला २८ एप्रिलला २०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त कुरेशी बोलत होत्या. शहरात अजिंठ्याच्या चित्रप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले.
मारुतीराव पिंपरे यांची ५० वर्षात अजिंठ्याची ३५० सुंदर चित्रे -अजिंठ्यातील चित्र शिल्पांनी सर्व जगाला मोहित केले आहे. चित्रकार स्वर्गीय मारुतीराव पिंपरे यांनी लेण्यातील अजोड नमुन्याला आपल्या चित्रशैलीतून हुबेहुब साकारलेले आहे. त्यांच्याच कलाकृतीचे प्रदर्शन त्यांची मुलगी मयुरा पिंपळे यांनी शहरातील काल्डा कॉर्नर भागात असलेल्या मालती आर्ट गॅलरीत भरविले आहे. त्यांच्या वडिलांनी अजिंठा लेणीचे महत्त्व चित्रकलेतून सांगण्याचा ५० वर्ष प्रयत्न केला होता. तोच वारसा त्यांची कन्या मयुरा या पुढे चालवीत आहेत. हा वारसा पुढेही चालूच ठेवणार आहे, असे मयुरा यांनी सांगितले. मयुरा यांनी सांगितले, की वडिलांनी ५० वर्षात अजिंठ्याची ३५० चित्रे काढली आहेत. यातून २ हजार वर्षापूर्वीच्या लेण्यांचा अंदाज येऊ शकतो.
'बामु'ने लेण्यांचा इतिहास अभ्यासक्रमात घेतला नाही-
ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी दोनशे वर्षापूर्वी लेणीचा शोध लावल्याचे डॉ. दुलारी कुरेशी यांनी सांगितले. रॉबर्ट गिल व पारो यांचे अजिंठ्यात घडलेले प्रेमसंबंध तसेच इंग्रजांनी वेळोवेळी केलेले संशोधनाबाबत त्यांनी माहिती सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ.पांढरीपांडे यांच्याशी संपर्क करून लेण्यांच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीचा विचार झाला नसल्याचे कुरेशी यांनी यावेळी सांगितले.