औरंगाबाद - श्रीरामपूर येथील रुग्णाला उपचार देण्याऐवजी दाखल करून घेण्यास नकार दिल्याने रुग्ण अत्यवस्थ झाला. त्यावेळी हेल्प रायडर ग्रुपच्या मदतीने रुग्णाला उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचल्याची घटना औरंगाबाद शहरात समोर आली.
श्रीरामपूर येथून आला होता रुग्ण...
श्रीरामपूर येथील रहिवाशी असलेल्या एका रुग्णाला कोठेही बेड उपलब्ध होत नव्हता, त्यावेळी औरंगाबादच्या साई संकेत हाँस्पिटल येथे बेड उपलब्ध आहे असे त्यांना समजले व क्षणाचाही विलंब न करता लगेचच रूग्णवाहीकेने औरंगाबाद गाठले. अक्षय गलांडे हे त्यांचे सहकारी रुग्णाला घेऊन साई संकेत हाँस्पिटलला आले. अॅडमीट करण्याची तयारी चालू असतांना पेशंटची तब्येत खालावली. त्यामुळे ऐन वेळेवर रूग्णालय प्रशासनाने त्यांना बेड देण्यासाठी नकारात्मक भूमिका घेतली. बेड उपलब्ध होणार नाही हे सांगितले, ही गोष्ट रुग्णाला समजताच तो अस्वस्थ झाला आणि जागेवर कोसळला.
हेल्प रायडर सदस्यांनी केली मदत...
रूग्ण हा सुतगीरणी चौकात रस्त्यावर पडलेला होता. त्याला ऑक्सिजन लावून वाचवण्यासाठी सहकारी जिकरीने प्रयत्न करू लागले. रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली,परंतु कोणीही मदतीसाठी पुढे येण्याची तसदी घेत नव्हते. रुग्ण जीवाच्या आकांताने वाचण्यासाठी रस्त्यावर तडफड करत होता. ही गोष्ट तेथून जाणारे हेल्प रायडर्स् परिवारातील दिपक साळवे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी शशांक चव्हाण यांच्या मदतीने उपचारासाठी धावपळ सुरू केली. ग्रुपचे सदस्य भुषण कोळी यांनी घाटीत डॉक्टरांना फोन करून रूग्णाची परिस्थिती ही अत्यंत नाजूक असून दाखल करून घेण्यासाठी विनंती केली व घाटी रूग्णालयाने क्षणाचाही विलंब न करता रुग्ण दाखल करून घेतला आणि त्वरित त्या रुग्णावर उपचार सुरू झाले.
गरजूंना संपर्क करण्याचे आवाहन...
सध्याची स्थिती चिंताजनक आहे. एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून हेल्प रायडर ग्रुप गरजूंना मदत करत आहे. कोणाला तातडीची मदत लागल्यास आम्हाला संपर्क करा असं आवाहन
अँब्युलन्स हेल्प रायडर्स, मुख्य समन्वयक संदीप कुलकर्णी यांनी केलं आहे.
हेही वाचा - मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करा, विराट कोहलीचे आवाहन