औरंगाबाद - वादग्रस्त विधान आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे समीकरण नवीन नाही. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक आरोप दानवे यांनी केला आहे.
शेती विषयक कायदा फायद्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करायला तयार आहे. पण बाकीच्या लोकांना हे मान्य नसून सध्या शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला.
याआधी सीएए आणि एनआरसीमुळे निर्माण केला वाद
या देशात आधी सीएए आणि एनआरसीमुळे उचकवण्यात आले. या कायद्यामुळे एक मुस्लिम तरी देशाबाहेर गेला का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. हे आंदोलन बाहेरच्या देशाचं षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असंही दानवे म्हणाले. आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन देखील दानवें यांनी केले आहे.