औरंगाबाद: शिंदे गटाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या दातांवर उपचार सुरू असताना अचानक वीज गेल्याने उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलच्या लाईटच्या उजेडात त्यांचे उपचार केले. (guardian minister took treatment in mobile light) पालकमंत्र्यांसोबत ही घटना घडताच गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेली जनरेटरची मागणी लगेच मंजूर झाली.
घाटी रुग्णालयात उपचार: जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे घाटी रुग्णालयात पाहणीला आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या दातांची तपासणी करून दातांचे एक्सरे काढले. दातांचे रूट कॅनल करावं लागणार असं डॉक्टरांनी सागितल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र रूट कॅनल सुरू असताना अचानक वीज गेली. त्यामुळे पुढील उपचार मोबाईलचा लाईटच्या प्रकाशात करण्यात आले.
जनरेटर नसल्याने अडचण: उपचार पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जनरेटर बाबत डॉक्टरांकडे विचारणा केली. त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून जनरेटरची मागणी केली आहे, मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. आज नेमक्या पालकमंत्र्यांवर उपचार सुरू असतानाच हा प्रकार घडला. मात्र हा त्रास नेहमीचाच असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मागणी लगेच झाली मंजूर: गोरगरिबांवर उपचार करणाऱ्या घाटी रुग्णालयात सेवा सुविधांचा पूर्वीपासूनच अभाव आहे. रुग्णालयाने अनेक वेळा मागणी करूनही सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आहे. जनरेटरची मागणी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून केली जात आहे. मात्र त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत नव्हता. राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांना त्रास होताच, गेल्या पाच वर्षाची मागणी तातडीने मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता नेत्यांना आणि मंत्र्यांना त्रास झाल्यावरच सामान्यांच्या मागण्या मंजूर होणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय.