औरंगाबाद - कोरोनाचा देशभरातील वाढता प्रभाव पाहता औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली आहे. इतकेच नाही तर निवडणूक पुढे ढकलत असताना पालिकेला सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. मात्र, महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करु नये, असे नंदकुमार घोडेले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... ठाकरे-मुंडे यांच्या स्मारकाचे टेंडर घेऊ नका; इम्तियाज जलील यांचा ठेकेदारांना इशारा
दोन दिवसांपूर्वी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी निवडणूक पुढे ढकलून सहा महिन्यांसाठी प्रशासक नेमावा अशी मागणी केली होती. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासक नको मुदत वाढ द्या, अशी मागणी केली आहे.
औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे. मात्र, राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. निवडणुकीत प्रचार सभा आणि इतर प्रचार कार्यक्रमांमध्ये जास्तीतजास्त लोक एकत्र येतात. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती.
हेही वाचा... 'आम्ही औरंगजेबाचे वंशज नाही, त्यामुळे औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा'
महापौरांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक होईपर्यंत सरकारने प्रशासक नेमावा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली होती. त्यानंतर औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मात्र, निवडणूक पुढे ढकलून महापौरांना आणि सध्याच्या सदस्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महापौरांनी केली आहे.
प्रशासक नेमला तर लोकांची कामे होणार नाही. नगरसेवक हा महानगरपालिका आणि नागरिकांमधील दुआ आहे. त्यामुळे प्रशासकांच्या जागी नगरसेवकांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली.