औरंगाबाद - कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता औरंगाबादमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत आहे. विशेषतः लहान मुले बाधित होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांना तातडीने उपचार मिळावे यासाठी गरवारे कंपनीने पुढाकार घेतला आहे. पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये शंभर ते दीडशे खाटांचे अत्याधुनिक सुविधा असणारे लहान मुलांसाठीचे कोविड रुग्णालय उभारले जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.
लहान मुलांसाठी विशेष रुग्णालय -
कोरोनाची तिसरी लाट आल्यास लहान मुले मोठ्या प्रमाणात बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच औरंगाबादच्या चिखलठाणा परिसरात असलेल्या गरवारे कंपनीच्या जुन्या इमारतीत विशेष रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. जवळपास शंभर ते दीडशे खाटांचे हे अत्याधुनिक रुग्णालय असणार आहे, या रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट गरवारे कंपनी स्वतः उभा करणार असून, उपचार घेणाऱ्या बाल रुग्णांसाठी जेवण आणि नाष्ट्याची देखील व्यवस्था कंपनीतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.
विशेष रुग्णाला बाबत झाली बैठक -
गरवारे कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालया बाबत विशेष बैठक कंपनीच्या हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह गरवारे कंपनी व्यवस्थापक, महावितरण अधिकारी, एमआयडीसी अधिकारी यांची उपस्थिती या बैठकीत होती. या बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रुग्णालयात कशा पद्धतीच्या सुविधा असाव्यात याबाबत मार्गदर्शन केले. हे रुग्णालय लवकरच सुरू होईल असा विश्वास सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केला.
रुग्णालयात असतील रंगबिरंगी चित्र असलेल्या भिंती -
गरवारे कंपनीच्या इमारतीत सुरू करण्यात येणारे रुग्णालय हे विशेष रुग्णालय असणार आहे. यामध्ये दाखल होणारे रुग्ण हे लहान मुले असल्याने त्यांची विशेष काळजी घेतली जावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. रुग्णालयाच्या भिंतींवर रंगबिरंगी चित्र असतील, ज्यामुळे दाखल होणाऱ्या लहान मुलांना तिथे कंटाळवाणा होणार नाही. त्याचबरोबर रुग्णालयात टीव्ही स्क्रीन उपलब्ध असणार आहे. या स्क्रीनवर लहान मुलांना अनुषंगाने विविध चित्रफित त्याच्यावर प्रसारित केल्या जातील. ज्यामुळे लहान मुल उपचार घेत असताना सकारात्मक असतील आणि तिथे उपचार घेताना मूल कंटाळा करणार नाहीत, याबाबत सूचना दिल्याचे सुनील केंद्रेकरांनी सांगितले.
पालकांना राहण्यासाठी असेल व्यवस्था -
लहान मुलांना कोरोना झाला असला तरी त्यांचे आई-वडील त्यांना एकटं सोडत नाहीत, अशा अवस्थेत मुलाचे पालक देखील कोरोना बाधित होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गरवारे कंपनीत सुरू करण्यात येणाऱ्या, या दवाखान्यात मुलांवर उपचार करत असताना त्यांचे पालक त्यांच्या आसपास असावेत यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाजूला पालकांना राहण्यासाठी व्यवस्था ही केली जाणार आहे. जेणेकरून आपल्या मुलांच्या आसपास असल्याचे समाधान पालकांना असेल. इतकेच नाही तर उपचार घेत असलेल्या मुलांना आपल्या आई वडिलांची आठवण आली तर ते खिडकीमधून आई वडिलांशी संवाद साधू शकतील. ज्यामुळे पालकांचा होणारा त्रास वाचणार आहे, तशी विशेष व्यवस्था या रुग्णालयात असेल अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.
इतर कंपन्यांनी देखील पुढाकार घ्यावा -
कोविडमुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत चालला आहे. आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याने अनेक रुग्णांना उपचारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गरवारे कंपनी ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे मत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केल. औरंगाबाद औद्योगिक राजधानी म्हणून ओळखली जाते. अनेक नामांकित कंपन्या या शहरात आहेत. उद्योग क्षेत्रातून खूप मोठी मदत मिळत आहे. मात्र, आता मदत ही वेगळ्या स्वरूपाची करण्याची गरज निर्माण झाली असून गरवारे प्रमाणे ज्या कंपन्यांना शक्य आहे, अशा उद्योगांनी पुढाकार घ्यावा अशी भावना सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केली.