औरंगाबाद - बनावट क्रीडा प्रमाण पत्राची वैधता प्रमाणित करणाऱ्या क्रीडा उपसंचालक, एका कर्मचाऱ्याला बनावट प्रमाणपत्र देण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या दोन एजंटला औरंगाबाद शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात अनेकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करत नोकरी लाटली आहे. याचा तपास करण्यात येत असून या प्रकरणात मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
क्रीडा कोटातून नोकरी मिळण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार ऑक्टोबर महिन्यात समोर आला होता. औरंगाबाद विभागात 262 उमेदवारांनी क्रीडा प्रमाणपत्र सादर केल असून त्यापैकी 259 प्रमाणपत्र बनावट असल्याचे अहवालात समोर आल होते. त्यातील 40 जणांनी या प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याच निष्पन्न झाल्याची माहिती क्रीडा उपसंचालक उर्मीला मराळे यांनी दिली होती.
विशेष म्हणजे सादर केलेले प्रमाणपत्र एकाच क्रीडा प्रकारातील आहे. जिम्नॅस्टिक खेळातील ट्रेम्पोलीन आणि टॅबलिंग या क्रीडा प्रकारातील सर्व प्रमानपत्र आढळून आले. त्यानुसार प्रमाणपत्र सादर केलेल्या 259 उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. क्रीडा कोट्यातून पाच टक्के नोकरी देण्यात येत असते. त्या कोट्यातून नोकरी मिळावी यासाठी अनेक खेळाडू प्रयत्नशील असतात. मात्र राज्यात घडणार्या अनेक खेळाडूंचा हक्क मारुन बोगस प्रमाणपत्र सादर करत नोकरी लाटण्यात आली. माजी उपसंचालक यांनी सादर केलेले प्रमाणपत्र वैध असल्याचा शिक्का मोर्तब केला होता. त्यामुळे तत्कालीन क्रीडा उपसंचालक राजकुमार महादवाड, निलंबित क्रीडा अधिकारी भगवान वीर, एजंट शंकर पतंगे आणि प्रल्हाद राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
लाखो रुपये घेऊन दिले जात होते प्रमाणपत्र-
जिम्नॅस्टिक खेळातील ट्रेम्पोलीन आणि टॅबलिंग या खेळाचे प्रमाणपत्र देणारी टोळी राज्यभर सक्रिय आहे. या खेळाचे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग असणारे प्रमाणपत्र तयार करून विक्री केले जायची. 25 हजार ते तीन लाख रुपये किमतीत आरोपींनी जवळपास 268 जणांना बनावट प्रमाणपत्र दिले होते. आरोपी शंकर पतंगे आणि अंकुश राठोड हे दोघे ग्राहक शोधून आणायचे आणि नंतर बनावट प्रस्ताव तयार करण्यात येत होता. त्यानंतर क्रीडा अधिकारी भावराव वीर बनावट प्रमाणपत्र तयार करायचे तर त्याची पडताळणी क्रीडा उपसंचालक महादवाड करायचे.
या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. या घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करत असून या प्रकरणी अनेक बोगस खेळाडू निष्पन्न होतील, अशी शक्यता असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे यांनी दिली.
हेही वाचा- मुंबई पोलीस दलात मोठी उलथापालथ; तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या एकाच दिवशी बदल्या