औरंगाबाद - शहरातील देवानगरी येथे हवेत गोळीबार करून एका ठेकेदाराचे अपहरपण केल्याची घटना घडली आहे. पांढऱ्या रंगाच्या गाडीत आलेल्या लोकांनी या ठेकेदाराचे अपहरण केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. नाजीम पठाण राउफ पठाण असे अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत भोसले यांच्या घराच्या बांधकामचा ठेका पठाण यांनी घेतला होता. आज ते साईटवर सकाळी आले आणि कामगारांकडून बांधकामाची माहिती घेत असताना अचानक एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्याचवेळी धक्कादेत पठाण यांना गाडीमध्ये ढकलत नेले. त्यावेळी त्यांनी इतर कोणी नागरीक जवळ येऊ नये म्हणून हवेत गोळीबारही केला आणि पठाण यांचे अपहरण केले.
या घटनेची माहिती मिळताच साहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाले, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाडसह पथकांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली.
पोलिसांनी तयार केले पथक-
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनासाठी दखल झाले. सातारा पोलिसांसह, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी दाखल झाले असून दोन वेगवेगळी पथक तपासकामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलीस करत आहेत. त्यामाध्यमातून गाडी कोणती होती, तिचा क्रमांक काय? ती कोणत्या बाजूला गेली असावी याची माहिती पोलीस घेत आहेत.