औरंगाबाद - केंद्रिय मंत्री तथा सासरे रावसाहेब दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन वेडा आहे, हे सिद्ध करण्याचा विडा उचलल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. मला वेडे म्हणणाऱ्या दोघांकडे तुम्ही पाहिले, तर हे माझ्यापेक्षा 10 पट वेडे असल्याचे तुमच्या लक्षात येईल, अशी टीका करणारा व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.
वेडं म्हणजे डोकं नसलेला असा अर्थ होतो, तर डोकं असलेला म्हणजे चांगलं काम करणारा ,असा अर्थ होतो. मग कोरोनामुळे एकीकडे लोकांना अन्न मिळत नाही, लोक तडफडतात. त्यांना मदत करायचं सोडून आमच्या देशाचे अन्न पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे जावयाला वेडा कसं ठरवता येईल यात व्यस्त आहेत. मग यांना वेडा का नाही म्हणायचं? असा प्रश्न हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
याआधी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोन वेळा सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यात त्यांनी त्यांचे सासरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करत काही आरोप देखील केले होते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी एक नवा व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला. मी माझं सगळं दिलं तरी सुद्धा हे माझ्याच मागे का लागतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरेबद्दल तर बोलायला नको. ते म्हणतात हर्षवर्धन वेडा आहे. त्याच्याकडे तर सर्टिफिकेट आहे. अहो जे खैरे म्हणतात महामृत्युंजय जप केला, की कोरोना होत नाही. त्यांना मग काय म्हणावं? असा प्रश्न हर्षवर्धन यांनी केला. मला वेडं म्हणाऱ्यांनो राज्यात काय सुरू आहे. भाजप, राष्ट्रवादीसोबत काय जाते, शिवसेना काँग्रेससोबत काय जाते, हा खरा वेडेपणा सुरू असल्याचे जाधव म्हणाले. दानवेंना हाथ जोडून विनंती आहे. माझ्या मागे लागू नका, मला जगू द्या, अशी विनंती हर्षवर्धन जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत केली आहे.