औरंगाबाद - कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असली, तरी महानगरपालिकेचा भोंगळ कारभार अद्यापही समोर येत आहे. एका व्यक्तीने चाचणी केल्यावर त्याला संसर्ग झाल्याची माहिती महानगरपालिकेकडून कळविण्यात आली नाही. त्यामुळे सदरील व्यक्ती तब्बल सहा दिवस कोरोना पॉझिटिव्ह असूनही सर्रास समाजात वावरत राहिली. पॉझिटिव्ह असल्याचा त्याला सहा दिवसांनी कळले आणि त्याच्या कुटुंबीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नोकरीसाठी वैद्यकीय अहवाल जोडताना कळली माहिती
दशमेश नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने रेल्वे स्टेशन परिसरातील अग्निशामक दल तपासणी केंद्रात, 21 जानेवारी रोजी कोरोनाचाचणी केली होती. तपासणीवेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी तुमचा अहवाल पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला संपर्क केला जाईल आणि जर संसर्ग झालेला नसेल तर शक्यतो तुम्हाला संपर्क होणार नाही, असे सांगितले. पुढील दोन दिवस सदरील व्यक्ती आपल्या घरात अलगीकरण करून होती. मात्र महानगरपालिकेच्या वतीने अहवाल पॉझिटिव्ह असल्याची कुठलीच माहिती कळवली नाही. त्यामुळे कंपनीत पुन्हा रुजू होण्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी सदरील व्यक्ती गेली असता, तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात. तुम्हाला तातडीने उपचारासाठी दाखल व्हावे लागेल, असे सांगण्यात आले. अचानक कळलेल्या माहितीमुळे सदरील व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.
संसर्ग झाला असतानाही अनेकांच्या संपर्कात
21 जानेवारी रोजी सदरील व्यक्तीने आपली चाचणी करून घेतली. 23 तारखेपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने अहवालाबाबत कुठलीही माहिती दिली नाही. आपल्याला कुठलाही आजार झाला नसल्याचा समज करत 23 तारखेपासून ही व्यक्ती आपल्या नातेवाइकांच्या आणि मित्रमंडळींच्या संपर्कात आली. अनेक वेळा नातेवाईकांना भेटण्यासाठी ही व्यक्ती बाहेर गेली. मात्र अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच नातेवाईक आणि मित्र परिवारात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सहा दिवसानंतर उपचार सुरू
कोरोनाचाचणी केल्यावर तब्बल सहा दिवसांनी पॉझिटिव्ह असल्याची माहिती रुग्णाला मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्या रुग्णाला अग्निशामक दल कार्यालयाजवळ असलेल्या सेंटरमध्ये दाखल करून घेण्यात आले. इतकेच नाही तर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वच लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. नजरचुकीने अहवाल सांगण्याचे राहिला असेल, मात्र मी आता रुग्णालयात दाखल झालो असून माझ्यावर योग्यरित्या उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णाने दिली आहे.