औरंगाबाद - महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना (मेष्टा) तर्फे मराठवाडा पदवीधर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील पदवीधर सुशिक्षित बेरोजगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक अशा वेगवेगळ्या संघटनांना सोबत घेऊन या निवडणुकीत सहभाग नोंद घेण्याची घोषणा मेष्टातर्फे करण्यात आली.
हेही वाचा - 'रोहित पवारांनी शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरून आपली उंची मोजावी'
गेल्या बारा वर्षांमध्ये पदवीधर आमदार असतील किंवा शिक्षक आमदारांनी पदवीधरांच्या किंवा शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आता आपल्या समस्या आपणच सोडवायच्या या भावनेतून मेष्टा संघटना यापुढे राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मेष्टा संघटनेचे अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या काळात शिक्षक, संस्था चालक यांची अवस्था वाईट आहे. शिक्षकांनी आणि संस्था चालकांनी आत्महत्या केल्या, मात्र कोणत्या आमदारांनी जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. आज पदवीधर आणि शिक्षक आमदारांना नेमक्या समस्याच माहीत नाही. अधिवेशनात मुद्दे मांडता येत नाहीत असे लोकप्रतिनिधी कसा न्याय मिळवून देणार असा प्रश्न असल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून याबाबत चाचपणी करून मतदार नोंदणी करण्यात आली. आतापर्यंत 70 हजार पदवीधर मतदार नोंदणी करण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यातील सर्वच शहरांमध्ये उमेदवारांची चाचपणी केली जाईल, अशी भूमिका मेष्टा संघटनेचे अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी जाहीर केली.
औरंगाबादेत बैठक घेऊन ही भूमिका जाहीर करण्यात आली. बैठकीत महाराष्ट्रातील सर्वच शहरांमधील विविध पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. याबैठकीत महाराष्ट्र उपाध्यक्ष पी ऐन यादव, सुनंदा वडजे, कविता सोनवणे, सुरेश वाघचौरे या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीती नोंदवली. आतापर्यंत अठरा वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यात शिक्षक संघटना, डॉक्टर संघटना, कामगार संघटनाही पाठिंबा द्यायला तयार आहेत. पुण्याला शिक्षक आमदार तर मराठवाडा आणि नागपूरला पदवीधर आमदाराची निवडणूक लढवणार आहे, असे संजयराव तायडे पाटील यांनी सांगितलं.