औरंगाबाद - विद्यापीठ परिसरात एका घरातून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. दार बाहेरून बंद होते. त्यात परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच दामिनी पथक घराजवळ आले, आणि भुकेने व्याकुळ झालेल्या एक वर्षाच्या चिमुरडीची सुटका झाली.
जन्मदात्या पित्यानेच ठेवले डांबून -
विद्यापीठाच्या परिसरात एका इमारतीचे काम करण्यासाठी राहत असलेल्या वॉचमनने अपल्यापोटच्या मुलीला डांबून ठेवल्याचा धक्का प्रकार दामिनी पथकाच्या समोर आला. नवरा बायकोच भांडण झाल्याने नवऱ्याने बायकोला हकलून दिले. जाताना मुलीला आपल्या कडे ठेवले. मात्र, मुलगी रडती म्हणून बापाने दारूच्या नशेत तिला घरात कोंडले. दामिनी पथकाने चिमुकलीची सुटका करत तिची रवानगी बालगृहात केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी झाले भांडण -
विद्यापीठात बांधकामाच्या ठिकाणी वॉचमन असलेल्या तुळशीराम याचे पत्नीसोबत भांडण झाले. त्याने नेहमी दारूच्या नशेत असलेल्या तुळशीरामने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी कोल्हापूरला हाकलून दिले. त्यावेळी त्याने पत्नीला मुलाला घेऊन जाऊ दिले नाही. त्यादिवसापासून तो त्या चिमुकलीला रात्री दारू पिल्यावर मारहाण करायचा, तिला उपाशी ठेवायचा. बुधवारी दुपारच्या वेळी तिथे काम करणाऱ्या एका पेंटरला मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्याने तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला ही बाब कळवली.
दामिनी पथकाने केली सुटका -
दामिनी पथकाच्या हवालदार निर्मला निंभोरे, कॉन्स्टेबल श्रुती नांदेडकर आणि सरसांडे यांनी विद्यापीठात धाव घेतली आणि एका वर्षाच्या चिमुकलीची सुटका केली. भुकेने व्याकुळ चिमुकलीला त्यांनी बिस्किटे, समोसे खाण्यास दिले. तेव्हा तिचा बाप नशेत तर होता. त्याला त्याचे नाव सांगता येत नव्हते. पथकाने तिला ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर बाल कल्याण समितीसमोर तिला हजर केले. समितीने तिला भारतीय समाजसेवा केंद्र या बालगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
दोन महिन्यांपासून आईने ढुंकूनही पाहिले नाही -
चिमुकलीचा ३० वर्षीय पिता सुरक्षा रक्षकाचे काम करतो. दोन महिन्यांपूर्वी त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. ती कोल्हापूरला माहेरी गेली. दोन महिने उलटल्यानंतरही चिमुकलीच्या आईने तिच्याकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी, चिमुकलीचे हाल झाले. रोज नशेत राहणारा तिचा पिता तिला खायला देत नव्हता. ती रडायला लागली की मारहाण करून घराबाहेर फेकून द्यायचा. अखेर, पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी चिमुकलीची सुटका केली अन् या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात नोंद केली.