औरंगाबाद - अधिकाऱ्याने अरेरावी केल्याने महिला नगरसेविकेने सभागृहात भिंतीवर डोकं आपटून घेतल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मीना गायके असे या नगरसेविकेचे नाव असून सभागृहाताच चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीना गायके या पुंडलिक नगर वॉर्डातील शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्यांच्या वार्डात झालेल्या कामांचे देयक शिल्लक असल्याने ठेकेदारांनी काम बंद केल्याची तक्रार मीना गायके यांनी केली होती. यावर मनपाचे लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांना विनंती करायला गेल्यावर अधिकाऱ्याने अरेरावी केली. यानंतर संतप्त झालेल्या नगरसेविकेने सभागृहात केंद्रे यांची वाट अडवून भिंतीवर डोकं आपटून घेतले.
हेही वाचा 'वंचित'कडून एमआयएमला आठ जागांची ऑफर; एमआयएम-वंचित वेगळे लढणार?
मीना गायके यांनी सर्वसाधारण सभेत ठेकेदारांच्या थकीत देयकाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर महापौरांनी तातडीने देयक देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर मीना गायके यांनी लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांची भेट घेऊन थकीत देयक देण्याबाबत विचारणा केल्यावर लेखाधिकारी केंद्रे यांनी अवमानकारक वागणूक दिल्याची तक्रार मीना गायके यांनी सभागृहात केली. यानंतर सुरेश केंद्रे सभागृहातून बाहेर जात असताना मीना गायके यांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली व सभागृहाच्या भिंतीवर डोकं आपटायला सुरुवात केली.
हेही वाचा औरंगाबादसाठी मुख्यमंत्र्यांनी दिली नवी पाण्याची योजना
सुरक्षा रक्षक आणि इतर नगरसेवकांनी मीना गायके यांना बाजूला घेऊन समजूत काढली. दरम्यान, अचानक चक्कर आल्याने त्या खाली कोसळल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, मनपाचे लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांना परत पाठवण्याचा ठराव सभागृहात घेण्यात आल्याची माहिती उपमहापौर विजय औताडे यांनी दिली आहे.