औरंगाबाद - खेळताना लहान मुलांनी एखादी छोटी वस्तू गिळले तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही. मात्र 33 वर्षीय व्यक्तीने टूथब्रश गिळल्याची धक्कादायक आणि आश्चर्यकारक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. सकाळच्या सुमारास दात घासत असताना, त्या व्यक्तीने टूथब्रश गिळला. काहीवेळातच त्याच्या पोटात वेदना सुरू झाल्याने त्याने घाटी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून टूथब्रश काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. हा प्रकार पाहून डॉक्टर देखील चक्रावले होते.
अशी घडली घटना...
रविवार बाजार परिसरातील राहणारा व्यक्ती २६ डिसेंबरला सकाळी नेहमीप्रमाणे दात घासत होता. त्यावेळी अचानक त्याने टूथब्रश गिळला. त्यानंतर त्याला पोट दुखीचा त्रास होऊ लागल्याने सकाळी ११ वाजता त्या व्यक्तीस घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे गेल्यानंतर रुग्णांने सकाळी दात घासत असताना अपघाताने ब्रश गिळल्याची माहिती दिली.
रुग्णाची अवस्था पाहून तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. उपचारासाठी रुग्णाचा सीटी स्कॅनच्या माध्यमातून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्स पथक क्रमांक-६ चे प्रमुख जुनेद एम. शेख, डॉ. अविनाश घाटगे, डॉ. ओमर खान, डॉ. संदीप चव्हाण, डॉ.सुकन्या विंचूरकर, डॉ.गौरव भावसार, भुलतज्ज्ञ डॉ. अनिकेत राखूडे, डॉ. विशाखा वाळके, अधिपरिचारिका संतोशी सोनगट्टी यांनी ही अतंत्य गुंतागुतीची शस्त्रक्रिया पार पाडली.
या घटनेनंतर रुग्णाची तब्येत व्यवस्थित आहे. मात्र, ३३ वर्षीय व्यक्तीने टूथब्रश गिळल्याने डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.