औरंगाबाद : भारतीय रिझर्व बँकेच्या लिपिक पदाच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाचा मृतदेह औरंगाबादेतील महापालिका मुख्यालयाजवळ असलेल्या दफनभूमीत आढळून आल्याची घटना शुक्रवारी समोर आली. या युवकाची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास देविचंद चव्हाण (वय २३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विकास हा नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील हरीचा तांडा येथील रहिवासी आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या लिपिक पदाच्या परीक्षेसाठी गुरुवारी रात्री आठ वाजता तो गावातून निघाला. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास औरंगाबाद महानगर पालिकेच्या पाठीमागे असलेल्या दफनभूमी येथे त्याचा मृतदेह आढळला. स्थानिकांनी घटनेची माहिती सिटी चौक पोलिस ठाण्यात कळवली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विकास हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याचा हातही कापून फेकून दिलेला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हॉल तिकीटवरून पटली ओळख
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. यावेळी मृताची ओळख पटली नाही. मात्र श्वान पथकाने विकासची दूर फेकलेली बॅग शोधली. या बॅगमध्ये त्याची कागदपत्रे व हॉल तिकीट आढळून आले. यावरून त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.