औरंगाबाद - मित्राचे लग्न म्हणले तर इतर मित्रांचा जल्लोष हा नेहमीच पाहायला मिळतो. मात्र औरंगाबादमध्ये 'पल पल याद तेरी तडपावे' गाण्यावर केलेला जल्लोष नवरदेवासह मित्रांच्या अंगलट आला आहे. हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार आणि जांबिया घेऊन डांन्स केल्याने मित्रांसह नवरदेवाला पोलीस स्टेशनची हवा खावी लागली ( groom with friend arrested in Aurangabad ) आहे.
नवरदेवासह मित्रांचा तलवार घेऊन डांन्स -
26 जानेवारी रोजी रेणुकानगर परिसरात बिबीशन अनिल शिंदे याच्या हळदीचा कार्यक्रम होता. यावेळी कार्यक्रमात आलेले त्याचे मित्र यश साखरे, शेख बादशाह, शुभम मोरे, किरण रोकडे आणि वसीम शेख यांनी गाण्यावर ठेका धरला आणि वसीम शेख याने तलवार आणि शुभम मोरे याने दोन जांबिया बाहेर काढले. 'पल पल याद तेरी तडपावे' या गाण्यावर जल्लोष सुरू होता. हातात तलवार आणि जांबिया घेऊन नवरदेवासह त्याचे मित्र नाचले.
एक दिवसाची पोलीस कोठडी -
तलवार घेऊन डांन्स करणाऱ्या मित्रांचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहचला आणि नाचणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू झाला. त्यानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी बिबीशन शिंदेसह त्याचा मित्राला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, सर्व आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नवरी घरात आणि नवरदेव कारागृहात अशी अवस्था झाल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Sunil Grover Heart Surgery : हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर कॉमेडियन सुनील ग्रोव्हरला मिळणार डिस्चार्ज