औरंगाबाद - मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने मंगळवारी राज्य व केंद्र सरकारच्या भुमिकेबाबत औरंगाबाद - पैठण रोडवरील बिडकीन येथील निलजगाव फाट्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनातील मराठा समन्वयकांसह आठ कार्यकर्त्यांना बिडकीन पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केले आहेत.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा -
न्यायालयाने आरक्षण स्थगिती न उठवता एक महिना अधिक कालावधी घटनापीठाकडे जाण्यासाठी दिला. त्यामुळे संतप्त झलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. आरक्षणाविषयी गंभीर नसलेले मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुख्यमंञ्यांनी तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणीही आंदोलकांनी केली होती.
मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीला सरकारी वकीलच गैरहजर होते. त्यामुळे याविषयी महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही, असा आरोप करत मंगळवारी सायंकाळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी राञी उशिरा आंदोलनातील कार्यकर्त्यांवर बिडकीन पोलीस ठाण्यात कलम १८८, २६९, २७०, १४१, १४३, ४३१, ३३६ भादवी १३५ कलम २, ३, ४ अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल -
आंदोलनात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील, रविंद्र काळे, किरण काळे पाटील, मनोज मुरदारे, कृष्णा उघडे, अप्पासाहेब जाधव, परसराम मुरदारे, विजय हाडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलकांना अटक केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने सरकार विरोधात राज्यभरात आंदोलनाची धार तीव्र करणार असल्याचा गंभीर इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.
सरकार पोलिसांना पुढे करून मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची समितीवरून तत्काळ हकालपट्टी करावी. सरकारने कितीही षडयंञ केले तरी महाविकास आघाडी सरकार विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला.