औरंगाबाद - कोविडची दुसरी लाट ओसरत असताना 17 ऑगस्टपासून शाळेत इयत्ता पाचवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला असला तरी यात संभ्रम असल्याने शाळा सुरू होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा सुरू करण्यासाठी किमान आठ दिवसांचा वेळ तरी द्या, अशी मागणी संस्था चालकांनी केली आहे.
दीड वर्षांपासून शाळा आहेत बंद
मार्च 2020मध्ये कोरोना राज्यात दाखल झाला आणि सर्वात आधी काही जर बंद झाले असेल तर त्या आहेत शाळा आणि महाविद्यालय. पहिली लाट ओसरली असताना आठवी ते बारावी शाळा सुरू झाल्या आणि रुग्ण वाढताच त्याबंददेखील झाल्या. 15 जुलैपासून ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग पुन्हा भरले आहेत. त्यानंतर आता दीड वर्षांनी पाचवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याच्या हालचाली होत आहेत. त्यासाठी शाळांना वर्गखोल्या स्वच्छ करण्यासाठी आणि इतर तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. त्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यावरून घोळ सुरू असलेने संस्था चालक आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी मागणी आता शिक्षण आणि पालकांकडून केली जात आहे, अशी माहिती धारेश्वस शाळेचे मुख्याध्यापक पंढरीनाथ भवर यांनी दिली.
'मुलांचे लसीकरण केल्यास होईल फायदा'
कोरोनाला हरवण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन लसीकरण हा एकच मार्ग असल्याचे समोर आले. त्यामुळे शाळा सुरू करत असताना शिक्षकांचे लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. हे योग्य असून विद्यार्थ्यांचे लसीकरणदेखील करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यास लहान मूल बाधित होणार नाहीत, त्याचबरोबर त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही. म्हणूनच त्यांचे लसीकरण करून घेण्याबाबत शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी मनसे शिक्षक सेना सरचिटणीस सुभाष मेहेर यांनी केली आहे.