औरंगाबाद - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. कष्ट करून कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या महिलांची तर व्यथा न मांडलेलीच बरी अशी अवस्था आहे.
'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून अशा लोकांची व्यथा आमचे प्रतिनिधी जाणून घेत आहेत. औरंगाबादच्या पिसादेवी परिसरात राहणाऱ्या वैशाली दणके या महिलेची व्यथा आम्ही जाणून घेतली. वैशाली पिसादेवी परिसरात लोकांच्या घरी धुणीभांडी करून आपलं आणि आपल्या मुलांचा सांभाळ करत आहेत. कोरोनामुळे लोकांनी काही दिवस कामावर येऊ नको, असे सांगितल्याने आता घर चालवायचॆ कसॆ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वैशाली दणके या आपल्या आठ वर्षाच्या मुलासह पिसादेवी परिसरात राहतात. सासरी नवऱ्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिच्यावर लोकांच्या घरी धुणीभांडी करून उदरनिर्वाह करण्याची वेळ त्यांच्यावर आली. सहा ते सात घरांची धुणीभांडी करून आपल्या मुलाच्या पालन-पोषणाची जबाबदारी पार पाडायला सुरुवात केली. कोरोनाच्या संसर्गामुळे तिच्या आयुष्यात मोठा फटका बसला.
मिळालेली कामे बंद झाल्याने दोन वेळचे अन्न मिळवणे तिला अवघड झाले. घरात होत ते साहित्य संपले, रेशन कार्ड नसल्याने रेशन दुकानातून दॆखील धान्य मिळणार नसल्याने गरजा भागवणे अवघड झालं आहे. त्यात घर भाडे द्यायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही व्यथा औरंगाबादच्या वैशाली दणकेची नाही तर राज्यात तिच्यासारखी अवस्था असणाऱ्या असंख्य मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या प्रत्येकाची व्यथा आहे. गरिबांना घरपोच धान्य देऊ म्हणणार सरकार रेशन दुकानात देखील धान्य देईना. सरकार गरजूंना मदत देण्याची घोषणा करत असलं तरी प्रत्यक्षात ही मदत वेळेत मिळत नाही हीच गोष्ट खरी असॆच म्हणावं लागलं.