औरंगाबाद - जिल्हा रुग्णालयात बेटा तुम सून रहे हो. . . कैसे हो, या शब्दांनी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले. हे शब्द होते कोरोनाग्रस्त आईचे, जिनं तीन दिवसांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. तब्बल तीन दिवसांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आईनं आपल्या बाळाला पहिल्यांदा पाहिलं आणि संवाद साधला.
दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्त महिलेने मुलीला जन्म दिला होता. मात्र जन्मानंतर आपल्या मुलीला बघणेही आईला शक्य झाले नाही. त्यामुळे आईच्या जीवाला हुरहूर लागली होती. अखेर त्या मातेला आपल्या मुलीची पहिली झलक व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घडवण्यात आली. हा भावूक क्षण पाहून क्षणभर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले.
10 एप्रिलला मुंबईहून गर्भवती महिला बाळंतपणासाठी औरंगाबादेत आली. त्यावेळी तिच्या मुलाला आणि महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. शनिवारी औरंगाबादेत कोरोनाग्रस्त महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी मुलीला कुठलीही बाधा नसल्याचे निष्पन्न झाल्याने मुलीला वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले. महिलेला कोरोना असल्याने बाळाला त्या महिलेकडे देणे धोक्याचे होते. त्यामुळे जन्मदात्या आईलाच आपल्या मुलीला पाहता आले नाही.
आपल्या मुलीला पाहण्यासाठी आईची तळमळ सुरू होती. शेवटी डॉक्टरांच्या मदतीने व्हिडिओ कॉल करून आईला आपल्या मुलीची एक झलक पाहायला मिळाली. मुलीला पाहताच आईचे डोळे पाणावले आणि आईने आपल्या मुलीला बाळा कशी आहेस, असा भावनिक प्रश्न विचारला. तीन दिवसांच्या बाळाला आईच बोलणे कळले नसेलही, मात्र समोर उभे राहिलेले चित्र पाहून आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर काहीशे भावनिक झाले. अनेकांच्या मनातून एकच प्रार्थना निघाली ती म्हणजे देवा या बाळाच्या आईला लवकर कोरोनामुक्त कर आणि बाळाची भेट घडू दे...