औरंगाबाद - कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. उपचार मिळण्यासाठी एक तास घाटी रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकेत ताटकळ बसलो होतो असे ही त्यांचे म्हणणे आहे. अखेर कसेबसे उपचार सुरू झाले मात्र तो पर्यंत उशिर झाल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाने वेळीच खबरदारी न घेतल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना सुविधा कमी पडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बजाजनगर वाळूज येथील रुग्णाला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास घडली. रुग्णालयाने बेड उपलब्ध न केल्याने ही वेळ ओढावल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.
सकाळी 10 वाजता या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णांची दोन मुलं आणि दोन मेहुण्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हालवले. तिथे बेड उपलब्ध आहे का हे जाणून घेण्यात जवळपास दोन ते तीन तासांचा वेळ गेला. काही खासगी रुग्णालयात बेड बाबत माहिती घेतली. मात्र कुठेही व्यवस्था नसल्याने दुपारी साडेचारच्या सुमारास घाटी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे येईपर्यंत रुग्णाची अवस्था वाईट झाली. घाटी रुग्णालयात आल्यावर देखील व्हेंटिलेटर आणि बेड नसल्याने रुग्णाला तासभर रुग्णवाहिकेत ठेवावे लागल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला.
अखेर साडेपाचच्या सुमारास घाटी रुग्णालयात रुग्णाला भरती करण्यात आले. बऱ्याच वेळाने ऑक्सिजन मिळाला, मात्र रात्री दहाच्या सुमारास रुग्ण दगवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेळीच ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर मिळाले असते, तर रुग्ण वाचला असता, मात्र वेळीच सुविधा न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
नातेवाईकांनीच केले रुग्णालयात भरती
रुग्णाला घाटी रुग्णालयात भरती करण्यासाठी नेण्यात आले. रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेल्यानंतर आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने कोरोनाबाधिताला नातेवाईकांनीच स्ट्रेचरवर नेले. त्यामुळे रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना बाधा होण्याचा धोका देखील वाढला आहे.