औरंगाबाद - राज्यात सुरू असलेल्या 'ईडी'च्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal Criticize BJP On ED Enquiry ) यांनी भाजपावर निशाना साधला आहे. 'ईडी' हा राक्षसी कायदा आहे, याबाबत एकदा कारवाई झाली की, ते सर्व घेऊन टाकतात, घरदार देखील जाते. त्या कायद्याचा गैरवापर केला जातो आहे, सर्व राजकीय पक्षांनी ते थांबवलं पाहिजे, अन्यथा पुढील सरकार असेच करतील', असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. ते औरंगाबाद येथे ( Chhagan Bhujbal In Aurangabad ) पत्रकारांशी बोलत होते.
'विरुद्ध बोललं की कारवाई होते' - 'राज्यात सध्या काटा काढण्याचे काम सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. विरुद्ध बोलले की लगेच काटा काढायचा, कुठली ना कुठली कारवाई मागे लागलीच म्हणून समजा', अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. तुम्हाला लढायचं असेल तर मतदारांच्या कोर्टात लढा, निवडणुकीच्या माध्यमातून लढाई लढता येते, असेही ते म्हणाले.
'आमच्या बाजूने बोलणारे विरोधात बोलत आहेत' - काही मगिन्यांपूर्वी आमच्या बाजूने बोलणारे ईडी कारवाईच्या भीतीने विरोधात बोलत आहेत, असा टोला छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. काही वर्षांपूर्वी आमच्या सोबत व्यासपीठावर ते भाजप विरोधात बोलत होते. मात्र, एकदा ईडी कार्यालयातून बोलावणं आलं की लगेच यांची भाषा बदलली. ते आता महाविकास आघाडी विरोधात बोलू लागले आहेत, अशी टीका करत किरीट सोमैय्या कुठे गेले माहीत नाहीत. मात्र, त्यांना संजय राऊत बरोबर शोधून काढतील, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
'इंपिरियल डेटा बाबत संभ्रम' - केंद्राकडे ओबीसी आरक्षण देण्याबाबत इंपिरिकल डेटा मागितला, तर त्यांनी देण्यास नकार दिला. त्यात चूक आहे, असं केंद्राचे म्हणणं आहे. जर अस असेल तर मग उज्वला गॅस सारख्या इतर योजनांसाठी तो कसा वापरला गेला. तेव्हा चूक नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होतो. तर न्यायालयात हा डेटा ओबीसींचा नाही असं सांगण्यात आलं. त्यामुळे आरक्षण रद्द करण्यासाठी हे प्रयत्न असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी लगावला.