औरंगाबाद - करमाडजवळील जडगाव येथे तलावात कार पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (12 ऑक्टोबर) घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. वैजीनाथ उमाजी चौधरी (वय 52), मंगल वैजीनाथ चौधरी (वय 45), सुकन्या मधुर चौधरी (वय 22) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. एकलेरा देवीच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.
- देवीच्या दर्शनाला जाताना झाला अपघात -
मूळ सेलुद चारठा (ता. औरंगाबाद) येथील चौधरी कुटुंब हल्ली औरंगाबाद शहरातील गजानन नगर येथे वास्तव्यास आहे. जडगाव येथील वाघ कुटुंबाकडे ते भेटीसाठी गेले होते. भेट झाल्यावर चौधरी कुटुंबीय एकलेरा देवीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांची कार गावाजवळील साठवण तलावात पडली. गाडी पडताच गाडीतील वैजीनाथ चौधरी यांनी गाडीसह सर्वजण पाण्यात पडल्याची माहिती फोन करून दिली.
- अग्निशमन दलाच्या जवानांनी केले प्रयत्न -
माहिती मिळताच करमाड आणि जडगाव येथील गावकरी मदतीसाठी धावले, अग्निशमन दलाचे जवान देखील मदतीसाठी आले. मात्र, तो पर्यंत उशीर झाला आणि कार पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवळपास चार तास शोध मोहीम केल्यावर अखेर कारमधील वैजीनाथ उमाजी चौधरी, मंगल चौधरी, आणि सुकन्या चौधरी यांचे मृतदेह आढळून आले. गावकऱ्यांच्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांचे मृतदेह आणि दुर्घटनाग्रस्त कार बाहेर काढली असून, अधिक तपास करमाड पोलीस करत आहेत.
हेही वाचा - Corona Update : राज्यात 2069 नवे रुग्ण, 43 रुग्णांचा मृत्यू