औरंगाबाद - चिकलठाणा(Chikalthana) येथील कोविड सेंटरमध्ये(Chikalthana Covid Center) पॉझिटिव्ह रुग्णाच्या जागी दहा हजार रुपये देऊन कोरोना नसलेल्या तरुणांवर उपचार सुरु होते, या प्रकरणी मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली असून, इन्शुरन्सच्या(Insurance) पैशांसाठी हा प्रकार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
- असे आहे प्रकरण -
आतापर्यंत बोगस डॉक्टर असल्याचे ऐकलं असेल, पण कधी बोगस रुग्ण पाहिले आहेत का? मात्र प्रत्यक्षात औरंगाबादमध्ये अशीच घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील चिकलठाणा येथील महानगरपालिकेच्या मेलट्रॉन कोविड सेंटरमध्ये चक्क कोविडचे बोगस रुग्ण दाखल करण्यात आले होते. शहरातील सिद्धार्थ गार्डन पाहण्यासाठी आलेल्या दोघांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे त्यांना चिकलठाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, या दोघांच्या जागी दुसरेच दोघे उपचार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
- वैद्यकीय अधिकाऱ्यांना आला संशय -
मेलट्रॉन येथील वैद्यकीय अधिकारी आणि सेवकांना उपचारासाठी दाखल झालेल्या बोगस रुग्ण उपचार घेण्यास टाळाटाळ करत असल्याने संशय आला. त्यांनी कसून चौकशी केल्यावर पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे नाहीत हे समोर आले. याप्रकरणी एम सिडको पोलिसात तक्रार देण्यात आली.
- इन्शुरन्सच्या पैशांसाठी दाखल केले खोटे रुग्ण?
तक्रार मिळताच पोलिसांनी खोट्या रुग्णांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले आहे. त्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आलेला एकजण पोलिसांच्या हाती लागला. त्यावेळी इन्शुरन्ससाठी हा प्रकार घडवून आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ज्या डॉक्टरने खोटे रुग्ण भरती केले त्याच डॉक्टरने अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा इन्शुरन्स काढला होता. त्यामुळे हा सर्व प्रकार इन्शुरन्ससाठी असू शकतो, मात्र, अद्याप अजून तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले.