औरंगाबाद - भाजप महिला मोर्चातर्फे देशात सुकन्या समृद्धी योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील 70 हजार गरीब मुलींचे पालकत्व स्वीकारले जाणार आहे. भाजपच्या या राष्ट्रीय योजनेची सुरुवात औरंगाबादमधून करण्यात आली. योजनेच्या पहिल्या दिवशी देशात दोन हजार मुलींचे बँकेत खाती उघडल्याची माहिती भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली.
हेही वाचा - 'कृषी विधेयकातील अनेक मुद्दे काँग्रेसच्याही जाहीरनाम्यातील, मग विरोध का?'
भाजप महिला मोर्चा सुकन्या समृद्धी अभियान अंतर्गत देशातील गरीब विकलांग, निराधार मुलींचे पालकत्व भाजप महिला पदाधिकारी स्वीकारणार आहेत. यामध्ये सामाजिक चळवळीत सहभागी असणाऱ्या दात्यांच्या सहभाग घेतला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह सुरू करण्यात आला. त्यामध्ये देशातील 70 हजार मुलींची बँकेत किंवा पोस्टात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाती उघडण्यात येणार आहेत. या खात्यांत भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि इतर नेते मुलींचे पालकत्व घेत त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहेत. वयाच्या 10 वर्षाखालील पालकत्व घेतलेल्या मुलीच्या वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत हे पैसे तिच्या नव्याने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजना खात्यात जमा करण्यात येतील. त्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी मुलीच्या शिक्षणासाठी 50% टक्के रक्कम काढता येईल. तर, वयाच्या 21 व्या वर्षी पूर्ण रक्कम त्या मुलीला काढता येईल, अशी ही योजना आहे.
या योजनेत पहिल्याच दिवशी देशात दोन हजार मुलींची तर, औरंगाबादमधे दोनशे मुलींची खाती बँकेत उघडण्यात आली असल्याची माहिती रहाटकर यांनी दिली. पुढील एका आठवड्यात देशात सत्तर हजार गरीब मुलींचे पालकत्व स्वीकारण्याचे उद्दिष्ट भाजप महिला मोर्चा गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - ..तर 'खपल चॅलेंज' होईल, सायबर पोलिसांचा इशारा