औरंगाबाद - आमचे शहर कोरोनामुक्त करा, अशी मागणी भाजप शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. बैठकीसाठी शहरात आलेल्या सुभाष देसाई यांना भाजपच्या शिष्टमंडळाने याबाबत विनंती करणारे निवेदन दिले.
मनपा आयुक्तांच्या घरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यावर प्रशासनाला जाग आली का ? असा प्रश्न संजय केणेकर यांनी उपस्थित केला. आज लोकप्रतिनिधींनी एकत्रीत बैठक घेतली. सरकार असताना सत्ताधारी आमदारांना अधिकाऱ्यांच्या विरोधात बैठक घ्यावी लागत आहे. यावरुन सरकारचा यंत्रणेवर किती वचक आहे, हे लक्षात येते अशी टीका संजय केणेकर यांनी केली.
औरंगाबाद जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. रोज शंभर ते दीडशे कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासकीय यंत्रणा उपाय योजना करत आहे. मात्र त्या कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे आता तुम्हीच काही तरी करुन आमच्या शहराला वाचवा अशी विनंती भाजप शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. जिल्हाध्यक्ष केणेकर यांच्यासह राजू शिंदे, कचरू घोडके या भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सुभाष देसाई यांना ही विनंती केली.
जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज असताना त्या का वाढवल्या नाहीत. शहरात कोरोना सोडून इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना उपचार देण्यास खासगी रुग्णालय तयार होत नाहीत. याला जबाबदार कोण? खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना जास्तीचे शुल्क आकारले जाते हे कोण थांबवणार. इतर उपचार आणि ऑपरेशन करायला कोविड चाचणीची जबरदस्ती का ? असे काही प्रश्न भाजपने आपल्या निवेदनात उपस्थित केले आहेत. राज्यात कोरोनाच्या या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजप शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी केला.