औरंगाबाद : औरंगाबाद येथील पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ यांना त्यांच्या मतदारसंघातील मतदाराने पत्र लिहून समाचार घेतला. संजय शिरसाठ दगड असून, त्यांनी त्यांचा मुलगादेखील आमच्यावर लादला असल्याची टिका केली आहे. तर युवा सेनेचे किरण लखनानी ( Kiran Lakhnani of Yuva Sena ) यांनी पत्र लिहित ज्या भाजपने तुमचा पराभव करण्यासाठी त्यांचा उमेदवार उभा केला. त्याला मदत केली. त्यावेळी याच शिवसैनिकांनी जीवाचे रान केले होते. अशा भाजपसोबत जाण्यासाठी तुम्ही गद्दारी केली, असा जाब विचारला आहे.
संजय शिरसाठ यांनी लिहले होते मुख्यमंत्र्यांना पत्र : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत सेनेचे अनेक आमदार गेले. त्यातील औरंगाबादमधील पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ हेदेखील तेथील आमदार त्यात आहेत. त्यांनीही बंड पुकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्यांच्या कारभाराबाबत टीका केली आहे. त्यांनी पत्रात असे म्हटले की, उद्धव साहेब आता खरे शिवसैनिकांना मातोश्रीचे दरवाजे उघडे झाले आहेत. त्यामुळे अडीच वर्षे बंद असलेले दरवाजे आज उघडले. त्यामुळे आम्ही आनंदात आहोत. हाच धागा पकडून त्यांच्याच मतदारसंघातील मतदाराने त्यांना एक खरमरीत पत्र लिहून जाब विचारला आहे.
संजय शिरसाठ यांच्या मतदारसंघातील मतदार नाराज : जाब संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून जाब विचारला. परंतु, त्यांच्या मतदारसंघातील मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांना उमेदवार म्हणून स्वीकारण्यास मतदार तयार नव्हते असे असताना केवळ शिवसेनेवरील प्रेमापोटी मतदारांनी त्यांना निवडून आणले. तसेच, भाजपने त्यांच्याविरोधात 2019 साली उमेदवार उभा करून त्याला रसद पुरवली. आता ते त्यांच्या सोबत जात आहेत. या सगळ्याचा जाब विचारायला त्यांना खालील खरमरीत पत्र लिहले आहे. पाहूया काय आहे पत्रात........
असे आहे मतदाराचे पत्र.......
प्रिय,
संजय शिरसाटजी...
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण लिहिलेल्या पत्राबाबत आपल्याच मतदारसंघातील एका शिवसैनिकाच्या भावना..
आमचे वडील सांगतात आपण सक्रिय राजकारणात येण्या आधी रिक्षाचालक होता आणि आपणही हे अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवले आहे. संभाजीनगर स्थानिक शिवसेना नेत्यांवर विश्वास ठेवून आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पक्षाच्या, लोकप्रतिनिधी पदाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि आपण सर्वसाधारण रिक्षावालापासून ३ वेळेस आमदार झालात.
शिरसाट जी हेच नाही, तर आपण आपल्या मुलालाही आमची इच्छा नसताना आमच्यावर लादले. त्याचा भयानक त्रास सहन करूनही आम्ही मेहनत करून जनतेच्या साथीने त्यालाही लायकी नसताना निवडणूक दिले. हे सगळं फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांच्या प्रेमाखातर...
संजय शिरसाट म्हणजे आमच्यासाठी फक्त शिवसेनेने दाखवलेला दगड. याचा प्रत्यय तुम्हाला २०१९ सालच्या निवडणुकीत आला आहे. संजय शिरसाट या नावाला जनतेचा प्रचंड विरोध होता. जनतेचाच काय तुमच्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांनीसुद्धा आपली साथ सोडली होती. त्यासाठी पण अनेक कारणं होती. जेव्हा तुमच्या विरोधात सगळे उभे होते, आता तुम्ही ज्यांच्या सोबत So called हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत जाणार आहात त्या भाजपने राजू शिंदे नावाचा भाजपचा माजी उपमहापौर आपल्या विरोधात उभा केला. देवेंद्र फडणवीस स्वतः राजू शिंदेच्या संपर्कात होते. पैशांचा मोठा बाजार झाला, अनेक दिग्गज मंडळींनी आपल्याला पाडण्यासाठी कंबर कसली होती. तुमच्याच जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की आपणही निवडणूक काळात अनेक वेळा "रात्रीच्या" वेळी रडलात, हतबल झालात!
अगदी निकालाच्या आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही विजयाची आशा सोडली होती. पण, निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेला चमत्कार आपल्यासाठीसुद्धा आश्चर्यकारक होता. याचे आम्ही सगळे शिवसैनिक साक्षीदार आहोत. तो सर्व चमत्कार फक्त आणि फक्त आपल्याला शिवसेनेचा दगड समजून केलेल्या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे. शिवाजीनगर, पदमपुरा अशा अनेक भागांतून आपल्याला लीड मिळालेली मते ही शिवसेनेची होती; संजय शिरसाटची नाही. हे संभाजीनगर पश्चिममधील प्रत्येक मतदार, शिवसैनिक सांगू शकतो.
असो बोलण्यासारखं खूप काही आहे...
तुम्ही उद्धवसाहेब भेटत नाही म्हणता. काल त्यांनी, ते का भेटत नव्हते हे सांगितले. तुम्ही मतदारांना न भेटता अनेक "रात्री" मुंबईला कुठे घालवता याची कल्पना सर्वांना आहे. आपले अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले फक्त आणि फक्त शिवसेनेच्या आपुलकीपोटी. आमच्या जीवावर तुम्ही निवडून आलात.
तर अमाच्याही भावना ऐकून घ्या. आम्ही शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यासोबत आहोत आणि सदैव राहणार...
अजून जे काही मनात आहे ते येणाऱ्या निवडणुकीत बोलू.
लोभ असावा...
शिवसैनिक पदमपुरा,
संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ
हेही वाचा : Eknath Shinde Latter : आमदार शिरसाठांचा लेटर बॉंम्ब; शिंदे म्हणाले, ही आमदारांची खरी भावना