औरंगाबाद - लॉकडाऊन दरम्यान दुकाने सील करुन दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, तसेच गेल्या काही दिवसांपासुन व्यापार-व्यवसाय बंद आहे, यामुळे व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेऊन किमान चार ते पाच तास बाजारपेठ खुली करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शहरजिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी आघाडीकडून करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले आहे.
नागरिक व्यापाऱ्यांनी नियम पाळले -
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होत होती. त्यानंतर राज्यात ब्रेक दी चैन अंतर्गत निर्बंध कडक करत लॉकडाऊन सुरू करण्यात आला. या नियमावलीचे पालन करत व्यापाऱ्यांनीही लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला. परिणामी जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासुन बंद असलेल्या बाजार पेठेमुळे व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे. तर अनेक छोटे व्यापारी टोकाचे पाऊल उचलुन आत्महत्या करत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वच व्यापऱ्यांना बाजारपेठ सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहेत.
दुकानांवर झालेल्या कारवाया रद्द करा-
लॉकडाऊन काळात अथवा त्यापूर्वी ज्या दुकानांवर शहानिशा न करता व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करत दुकाने सील करण्याची कारवाई झाली आहे. ती कारवाई मागे घेत व्यापाऱ्यावरील गुन्हे रद्द करावेत. तसेच आता व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, किमान दिवसातून चार ते पाच तास व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे
छोटे व्यापारी कर्जबाजारी झाले असुन त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी. मनपाकडून कोरोनाच्या परिस्थितीत सर्व कर, लाईट बिल व इतर कर , त्यावरील व्याज माफ करुन प्रशासनाने एक आर्थिक पॅकेज व्यापारी वर्गासाठी घोषित करावे, शहरातील व्यापारी दहशती व दडपणाखाली आले आहेत, त्यावर प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेऊन आस्थापना उघडण्यास परवानागी द्यावी अशी मागणीही निवदेनातून करण्यात आली आहे. यावेळी संघटन सरचिटणीस राजेश मेहता ,व्यापारी आघाडीचे हितेश कांकरिया,संतोष बोरा,रोहित छाजेड उपस्थित होते.