औरंगाबाद - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाताना दिलेला आदेश आम्ही मोडणार नाही, असे मत शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शेवटच्या श्वासापर्यंत आपण शिवसेना आणि उद्धव साहेब यांच्या सोबत राहू, असे मत शिवसैनिकांनी व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांबाबत रोष व्यक्त केला.
शिवसैनिक झाले संतप्त - औरंगाबाद जिल्हा सेनेचा बालेकिल्ला समजला जातो. महानगर पालिकेपासून ते लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुकीत जिल्ह्यातून भरगोस मत सेनेला पडतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवडीचे शहर असल्याने विचारांचे वलय आजही कायम आहे. त्यामुळे, सेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर मोठ्या संख्येने आमदार त्यांच्यासोबत गेले असताना देखील शिवसैनिक आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाम उभा असल्याचा विश्वास गेल्या दोन दिवसांपासून दिला जातोय. आमदारांच्या बंडा नंतर आम्ही पुन्हा लढू, असा विश्वास व्यक्त करत दोन दिवसांपूर्वी शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता. कुठल्याही परिस्थितीत बाळासाहेबांचा शेवटचा आदेश मोडणार नाही. ते जाताना सांगून गेले माझ्यानंतर उद्धव आणि आदित्यला सांभाळा, हाच आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे. आणि तो आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाळू, अशी भावना माजी नगरसेविका पद्माताई शिंदे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेने सर्वस्व दिले, काय कमी पडले - तळागाळातील माणसाला शिवसेनेने सत्तेत वाटा दिला. रसत्यावर फाटके कपडे घालून चालणाऱ्याला आमदार ते खासदार अशी पदे सेनेने दिली. मग आता काय कमी पडले? असा रोष सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शहरातील पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ रिक्षा चालक होते. त्यांना नगरसेवक ते आमदार केल. प्रदीप जैस्वाल यांना नगरसेवक, महापौर, खासदार आमदार अशी पद सेनेमुळे मिळाली. यासाठी सर्वसामान्य शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचे पाणी केले. आणि आज त्यांना न सांगता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी गेलात. शिवसेनेने काय कमी केले? शिवसैनिकांचा विश्वासघात का केला? असा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. तर, गद्दारांना माफी नाही, असा इशारा माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला.
हेही वाचा - Devendra Fadnavis Went Delhi : देवेंद्र फडणवीसांचा धावता दिल्ली दौरा, राजकीय हालचाली वाढल्या