औरंगाबाद - रेशन दुकानातील गहू बाजारात विक्रीला घेऊन जाणारी गाडी अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडली. या गाडीत साडेतीन क्लिंटल गहू आढळून आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. दिलेल्या तक्रारीवरून चेअरमन राजीव गांधी प्राथमिक ग्राहक सह. सस्था यांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून रेशन दुकानातील अन्नधान्य खुल्या बाजारात विक्री करून काळाबाजार सुरू असल्याची तक्रार अन्न पुरवठा भागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार पाळत ठेवून अन्नधान्य पुरवठा निरीक्षक अशोक दराडे यांनी औरंगाबादच्या सिडको एन - ६ परिसरात ही कारवाई केली.
अन्नधान्य वितरण अधिकारी 18 डिसेंबरला सकाळी 08:45च्या सुमारास, एन 6 परिसरातील इ-29/8, मथुरानगर औरंगाबाद येथील गुरुदेव धान्यालय में. गजानन पंडीत यांच्या दुकानासमोर, अॅपे रिक्षा आढळून आली. सदर वाहन चालकास त्याच्या रिक्षात गोण्यामध्ये असलेल्या धान्याची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, साडे तीन क्विटंल इतका गहू असून, सदर गहू हा रा.भा.दु.क्र.109 बायजीपुरा या ठिकाणाहुन आणला असून तो खासगी बाजारात विकण्यासाठी आणला असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदरील गहू हा सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंर्तगत असल्यामुळे गहू स्थानिक पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला.
वाहन चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गहू हा रा. भा. दु. क्र १०९ इम्पार्ट राजीव गांधी प्राथमिक ग्राहक सह. संस्था, औरंगाबाद सलग्न रास्त भाव दुकान क्रंमाक १३६, चेअरमन राजीव गांधी प्राथमिक ग्राहक सह. संस्था या दुकानातून खासगी बाजारात विक्री करता नेत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार रिक्षा चालक जब्बार अद्बुल (रा. बायजीपुरा ) आणि चेअरमन राजीव गांधी प्राथमिक ग्राहक सह. सस्था औरंगाबाद यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३ व ७ नुसार कलम ३७९ नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.