औरंगाबाद : टीव्ही सेंटर मैदानावरील गाळ्यात सिद्धार्थ साळवे या ३६ वर्षीय कामगाराच्या हत्येचा उलगडा करण्यात सिडको पोलिसांना अखेर २२ दिवसानंतर यश आले. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आयाज खान बशीर खान असे मारेकऱ्याचे नाव असून न्यायालयाने त्याची १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. आयाज हा जेसीबी चालक आहे.
दारू पिण्याच्या कारणावरून झाला होता वाद
सिद्धार्थ भगवान साबळे व मारेकरी आयाज हे दोघे २० जानेवारीच्या रात्री टीव्ही सेंटर परिसरातील दुकानातून दारू खरेदी केली. त्यानंतर दोघेही टीव्ही सेंटर येथील मनपाच्या स्टेडियमजवळ गेले. तेथे दारू पीत असताना दोघामध्ये किरकोळ वाद झाला. तेव्हा मयत साबळेने आयाजला शिवीगाळ केली. त्यामुळे आयाजने रागाच्या भरात आल्याने साबळे यांच्या अंगावर धाव घेतली. त्याला पाहून साबळे तेथून पळाले व स्टेडियमच्या कोपऱ्यातील गाळ्यात गेले. तेथे दोघांमध्ये झटापट झाली. दरम्यान आयाजने जवळचा दगड उचलून सिध्दार्थच्या डोक्यात मारला. यामुळे तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. आयाजने त्याच दगडाने पुन्हा साबळेवर वार केले. साबळे मृत झाल्याचे लक्षात येताच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर आयाज तेथून पसार झाला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही, मोबाईल डेटा व खबऱ्यांच्या मदतीने आयाजला तब्बल २२ दिवसांच्या शोधानंतर अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली आहे. ही कारवाई सिडको ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार, निरीक्षक विनोद सलगरकर, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक अशोक अवचर, प्रकाश डोंगरे, विजयानंद गवळी आदींच्या पथकाने केली.
हेही वाचा - Inspector Find out in Satara : जालना एसीबीचे बेपत्ता पोलीस निरीक्षक 13 दिवसांनी सापडले सातारा जिल्ह्यात