औरंगाबाद - कोरोनानंतर बुरशीजन्य आजार होण्याची भीती नागरिकांमध्ये वाढली आहे आणि त्यामुळेच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. प्रत्येक 2 जणानंतर एक रुग्ण हा भीतीपोटी डॉक्टरांकडे येत असल्याची माहिती औरंगाबादचे नेत्रतज्ज्ञ डॉ. राजीव मुंदडा यांनी दिली.
बुरशीजन्य आजार होण्यासाठी लागतो विशेष कालावधी
कोविड बरा झाल्यावर बुरशीजन्य आजार होत आहेत. या आजारात दात आणि डोळे कायमचे निकामी होण्याची भीती असते आणि त्यामुळेच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र हा आजार होण्यासाठी एक विशेष कालावधी असतो. कोविड झाल्यानंतर साधारणता पंधरा ते वीस दिवसांमध्ये याबाबतची लक्षणे दिसू लागतात. प्रामुख्याने नाक गळणे, नाकाला सूज येणे, डोळे जळजळ करणे, डोळे दुखणे अशी लक्षणे ही आढळून येतात. मात्र अशी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क केल्यास पुढील धोका टळू शकतो, असे मत मुंदडा यांनी व्यक्त केले.
भीतीमुळे वाढत आहे चिंता
औरंगाबाद जिल्ह्यात कोविडचे उपचार घेतल्यानंतर बुरशीजन्य आजार होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र हा आजार होणाऱ्या रुग्णांना कोरोना झाल्यावर, व्हेंटिलेटर लागणे, त्यावेळेस त्यांच्यावर स्टेरॉइडचा वापर अधिक प्रमाणात होणे, रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती प्रमाणापेक्षा जास्त कमी होणे असा त्रास झाला असेल, तरच हा बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता निर्माण होते. उपचार घेतल्यावर पंधरा दिवसांमध्ये हा आजार होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा अधिक काळ झाल्यावर मात्र हा आजार होत नाही. असे असले तरी भीतीमुळे ज्या रुग्णांना सहा महिने आधी कोरोना झाला होता असे रुग्ण देखील डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. भीतीमुळे त्यांना डोळे दुखत आहेत, डोळे जळजळ करत आहेत, डोळ्यांमधून पाणी येत आहेत, असे भास होत आहेत. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडे हे रुग्ण भीतीपोटी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक दोन रुग्ण मागे एक रुग्ण हा भीतीपोटी डॉक्टरांकडे येत असल्याचे काही दिवसांमध्ये आढळून आले आहे. नागरिकांनी या आजाराबाबत जास्त भीती न बाळगता स्वतःची काळजी घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन डॉ. मुंदडा यांनी केले आहे.