औरंगाबाद - रेड झोनच्या बाहेर असणारे उद्योग सुरू करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये बाजाज समूहाने एक महिन्यानंतर कंपनी सुरू केली आहे. नियम आणि अटींच्या आधीन राहून काम सुरू करण्यात आले आहे. कंपनीच्या जवळ वास्तव्यास असणाऱ्या कामगारांना कामावर रुजू होण्यासाठी सांगण्यात आले आहे.
मुख्य शहराचा भाग कोरोना हॉटस्पॉट असल्याने शहरातून कोणत्याही कामगारांना येण्यास मनाई करण्यात आली. वाळूज परिसरात राहणाऱ्या जवळपास सातशे कामगारांना घेऊन कामाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा आवश्यक परवानग्या देण्यात आल्या आहेत. सध्या दोन शिफ्टमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे सर्वच ठिकाणचे उद्योग बंद करण्यात आले होते. मात्र, एक महिन्यानंतर काही प्रमाणात नियम शिथिल करून कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. एमआयडीसीतील कंपन्यांनी उद्योग सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यामध्ये नियमांची पूर्तता करणाऱ्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अग्रगण्य बजाज समूहाने देखील कंपनी आजपासून सुरू केली.
काम करत असताना किंवा कॅन्टीनमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन केले जाणार आहे. तर कामगारांच्या वाहतुकीसाठी असणाऱ्या बसमध्ये फक्त 20 कामगारांची वाहतूक केली जाणार आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना देखील दिलासा मिळाला आहे.