औरंगाबाद - सरकारी पदभरतीमध्ये खेळ कोट्यातील उमेदवारांसाठी राखीव कोटा ठेवण्यात येतो. मात्र, या राखीव कोट्यात नोकरी मिळवण्यासाठी अनेक उमेदवार बनावट प्रमाणपत्रे सादर करत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, या बनावट उमेदवारांवर कारवाई करण्याचा पवित्रा क्रीडा विभागाने घेतला असला, तरी औरंगाबाद खंडपीठाने या कारवाईवर स्थगितीचे आदेश दिले आहेत.
बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप असलेल्या उमेदवाराने न्यायालयात धाव घेतली आहे. किशोर खेडकर असे या उमेदवाराच नाव असून शिरूर कासार येथे कृषी सहायक पदावर ते कार्यरत आहेत. नौकरी मिळवत असताना प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी बरोबर असणारे प्रमाणपत्र आता खोटे कसे? असा प्रश्न खेडकर यांचे वकील अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे. त्यावर न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
हेही वाचा - 'ही' कंपनी देशात ५.४८ लाख नोकऱ्या देण्याचे करणार नियोजन
पोलीस, महसूल, परिवहन, कृषी, आरोग्य, वीज वितरण, स्थानिक लेखा परीक्षण विभागात नौकरी मिळवण्यासाठी खेळ कोट्यातून 262 उमेदवारांनी अर्ज केले होते. संबंधित विभागामार्फत कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. यामध्ये खेळ खेळल्याचे सादर केलेले प्रमाणपत्र पडताळणी केले गेले. औरंगाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यातील उमेदवारांचे खेळ प्रमाणपत्र तपासणी करण्यात आली. या पडताळणीत 262 पैकी 259 उमेदवारांचे खेळाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. फक्त तीन उमेदवारांचे खेळ प्रमाणपत्र योग्य आहेत. या काळात 32 उमेदवारांना या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारावर नौकरी मिळल्याची माहिती क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे यांनी दिली होती. त्यानुसार सर्वच उमेदवारांना याबाबत पत्राद्वारे प्रमाणपत्र रद्द करत असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार नौकरी मिळालेल्या उमेदवारांची नोकरी जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.
दरम्यान, उमेदवारांनी आपल्या शालेय जीवनात खेळ खेळल्याचे हे प्रमाणपत्र सादर केले होते. सन 1997 ते 2005 या काळात खेळात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. सरकारी नोकरी मिळवणाऱ्या किशोर खेडकर यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. सरकारी नोकरी मिळवत असताना सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. एकदा नाही तर दोनदा या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. त्याबाबतची कागदपत्रे देखील याचिकेसोबत जोडण्यात आली आहेत. असा युक्तिवाद अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले. हे आदेश एका उमेदवारांच्या बाबतीत असले तरी त्याचा फायदा नौकरी मिळवणाऱ्या सर्व उमेदवारांना होणार आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र सादर करून नौकरी मिळवल्याचा आरोप असलेल्या उमेदवारांना तूर्तास तरी दिलासा आहे. न्यायालय पुढील सुनावणीत काय निर्णय देईल, याकडे मात्र आता लक्ष लागले आहे.
हेही वाचा - नोकरी मिळवण्यासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र; 259 जणांवर होणार गुन्हा दाखल