औरंगाबाद (पैठण) - बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना पैठण येथील बालानगर येथे घडली. या प्रकरणी ५ आरोपीविंरुद्ध पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणतीही वैद्यकीय शिक्षण पात्रता नाही
बालानगर येथील डॉक्टर अरबिंदो बिस्वास हा बोगस दवाखाना चालवित असल्याची माहिती आरोग्य पथकाला मिळाली. त्यावरून पैठण तालुका आरोग्य अधिकारी भूषण आगाज, वैद्यकीय अधिकारी युसुफ मनियार, वैद्यकीय अधिकारी सुभाष थोरात यांनी बोगस डॉक्टर बिस्वास याच्या दवाखान्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शिक्षण पात्रता आढळून आली नाही तसेच अॅलोपॅथी औषधे, इंजेक्शनेचा साठा व शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे आढळून आली.
पथकावर हल्ला
चौकशी करत असताना डॉ. बिस्वास याने आरडाओरड करून गावातील लोक जमा केले. यावेळी आरोपी भगवान गोर्डे, शिवाजी गोर्डे (दोघे रा. बालानगर) यांनी डॉक्टरवर कारवाई करू नका, असे पथकाला सांगत शिवीगाळ व लोटालोटी करून तेथील इंजेक्शनचा साठा व शस्त्रक्रिया करण्याची उपक्रमे सोबत घेऊन गर्दीतून निघून गेले व सदर बोगस डॉक्टरला फरार होण्यास मदत केली व तसेच आरोपी रवी भुजबळ, आसिफ शेख (दोघे रा. बालानगर) यांनी विनाकारण जमा होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल, अशी गर्दी केली. आरोपी डॉ. अरविंद बिस्वास याने गावातील लोकांचा डॉक्टर आहे असे भासवून फसवणूक केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. युसूफ मनियार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बालानगर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच आरोपीविंरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. पो. नि. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.