औरंगाबाद - शिवसेनेतील पक्षअंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले असून, युवा सेनेच्या मेळाव्यात दोन गटात हाणामारी झाल्याचे पाहायला ( Aurangabad Yuvasena quarrel ) मिळाले. युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या मेळाव्यानंतर ही हाणामारी झाली आहे. स्थानिक नेते वाद सोडवत असताना कार्यकर्ते त्यांना आवरत नसल्याच पाहायला मिळालं.
कार्यकर्ते एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले : औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरात आज युवा सेनेच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. युवासेना नेते वरून सरदेसाई यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप झाल्यावर प्रमुख नेते गेल्यावर युवासेनेचे दोन गट जुन्या वादामुळे आमने-सामने आले. राजेश कसुरे (तालुका प्रमुख) आणि सागर शिंदे (शहर प्रमुख) यांच्यात हा वाद होता. सुरवातीला शाब्दिक वाद झाला. रंगमंदिरमधून बाहेर पडताच दोन्ही गटांमध्ये थेट हाणामारी सुरू झाली. दोन्ही बाजूने कार्यकर्ते एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले. त्यानंतर सेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला.
नेत्यांचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न : या सर्व गोंधळानंतर युवासेना नेते आणि माजी महापौर राजेंद्र जंजाळ म्हणाले की, कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी बाहेर पडत असताना, धक्का लावण्याच्या कारणावरून दोन तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचे मला कळलं आहे. पण हाणामारी करणारे तरुण शिवसेनेचेच कार्यकर्ते आहे का? याचा आम्ही शोध घेत आहोत. तसेच जर ते पक्षाचे कार्यकर्ते असतील तर नक्कीच वरिष्ठांना कळवली जाईल. तसेच तो बाहेरचा जर कार्यकर्ता असेल तर त्याचा शोध घेऊन त्या पद्धतीने कारवाई केली जाईल, असं राजेंद्र जंजाळ यांनी सांगितलं.