औरंगाबाद - शहरातून राज्याच्या विविध भागात सुरू असलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग थांबवण्यात आला आहे. विभागीय आयुक्तालयात लावण्यात आलेली यंत्रणा लवकरच काढण्यात येणार आहेत. गेल्या चार महिन्यात मात्र किती कृत्रिम पाऊस पडला हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आले नसल्याने प्रयोगाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे 9 ऑगस्टपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली होता. मात्र, परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा प्रयोग बंद करण्यात आला असला तरी सरकार अस्तित्वात नसल्याने अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रयोग सुरू झाल्यापासून चार महिन्यात राज्यातील विविध भागात उपयुक्त ढगांमध्ये फवारणी करत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. या विमानाने एकूण 56 दिवस उड्डाण करून जवळपास 823 फ्लेअर्स ढगांमध्ये फवारून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला. त्यापैकी विमानाने फक्त 25 दिवस उड्डाण घेतले. औरंगाबाद येथे सुरु असलेला प्रयोग 100 तासांवर 100 तास मोफत या तत्वावर ख्याती वेदर मॉडीफिकेशन या संस्थेने दिला होता.