औरंगाबाद - शहरातील गारखेडा परिसरातल्या हुसेन कॉलनीत झालेल्या जून्या भांडणाचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या तरुणाची 8 ऑगस्टच्या रात्री शहरातील कुख्यात गुन्हेगारांनी निर्घृणपणे हत्या केली. तसेच त्या तरुणाला मारहाण करत असताना आरोपींनी त्याच्या अंगावर लघूशंका देखील केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये 5 जण त्या तरुणाला फिल्मी स्टाईलने भरचौकात मारहाण केल्याचे दिसून येत आहे. आकाश राजपूत असे त्या तरुणाचे नाव असून शहरातील न्यू हनुमाननगर येथे ही मारहाण झाल्यानंतर त्या राजपूत याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, न्यू हनुमाननगरातील आकाश राजपूत हा सागर केशभट या मित्रासोबत फर्निचरची कामे करत होता. काही दिवसांपूर्वी कुख्यात गुन्हेगार गणेश रवींद्र तनपुरे (१९, रा. गल्ली क्र. २, न्यू हनुमाननगर) याचे आकाशच्या मित्रासोबत हुसेन कॉलनीत भांडण झाले होते. त्यावेळी तेथ सागर देखील उपस्थित होता. त्याचा राग गणेशच्या मनात खदखदत होता. त्यानंतर 8 ऑगस्टला सागर आणि आकाश दोघे एकत्र दिसताच आरोपी गणेश तनपुरे याने त्या दोघांना गल्लीत रोखले. मात्र तनपुरेची परिसरात दहशत असल्यामुळे त्याला पाहून सागरने तत्काळ तेथून पळ काढला. पंरुतु तनपुरे याने आकाशला पकडून ठेवले.
निर्दयी मारहाणीचे व्हिडिओ चित्रिकरण-
आकाशने आरडाओरड सुरू करताच तेथे गणेशचा भाऊ ऋषीकेश रवींद्र तनपूरे (२१), मेव्हणा राहुल युवराज पवार (२४) आणि संदीप त्रिंबक जाधव (४५, मुळ रा. आंबेडकरनगर) हे देखील आले. त्यांनी आकाशला ओढतच बाजुला असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेने नेले. घरापुढे येताच या चारही जणांनी आकाशला निर्घृणपणे मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण केली. दोन्ही गुडघे आणि डोके फोडले. आकाश जमिनीवर कोसळताच आरोपी गणेशची आई मंगल रवींद्र तनपुरे (४०) हिने आकाशला दगडाने ठेचले. तर गणेश आणि ऋषीकेशने चाकूने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आकाश विव्हळत नागरिकांकडे मदतीसाठी याचना करु लागला. पण या गुन्हेगारांनी त्याच्या तोंडात माती कोंबली. त्यामुळे त्याचा आवाजही बाहेर निघत नव्हता. जवळपास दहा मिनिटे हा फिल्मीस्टाईल थरार सुरु होता. मात्र, शेकडो नागरिक केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. मात्र, ही मारहाण सुरू असताना आरोपींपैकीच कोणी एकाने या निर्घृण हत्येचा व्हिडिओ चित्रित केला आहे.
आकाशच्या शरीरावर केली लघूशंका-
मारहाण सुरु असताना मदतीसाठी आकाश टाहो फोडत होता. मात्र, कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. आरोपींनी लोखंडी दांडके आणि रॉडच्या सहाय्याने मारहाण करत क्रुरतेचा कळस गाठला. जीवाच्या आकांताने विव्हळत असलेल्या आकाशच्या अंगावर या आरोपींंनी थेट लघूशंका केली आणि त्याचेही व्हिडिओ चित्रिकरण केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या घटनेनंतर सर्व आरोपी त्याला जखमी अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पसार झाले.
तनपुरेंच्या नावाने फोडला हंबरडा-
आकाशला बेदम मारहाण केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील जमादार बाळाराम चौरे, सुखदेव कावरे आणि पोलीस मित्र अक्षय दाभाडे यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. आकाशला लगेचच पोलीस वाहनातून घाटीत दाखल करण्यात आले. त्यावेळी आकाशचा भाऊ प्रविण आणि आई मथुराबाई हे देखील सोबत आले. घाटीच्या दिशेने जात असताना आकाश प्रचंड विव्हळत होता. त्याने आपल्याला अख्ख्या तनपुरे कुटुंबियांनी मारहाण केली. साहेब त्यांना सोडू नका, असे म्हणत मदतीची याचना केली.
पोलीस आयुक्तांपुढे गुंडाचे आव्हान-
नव्याने शहरात रुजू झाल्यावर पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी गुंडागर्दी खपवून घेणार नाही. अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता पोलीस आयुक्तांना १९ वर्षीय नव्या गुन्हेगारानेच आव्हान दिले आहे. हनुमानगरातील या तनपुरे कुटुंबाची परिसरात प्रचंड दहशत आहे. चोरी, मारामारी, अवैध धंद्यांमध्ये हे अख्खे कुटुंब पुढे होते. शेजा-यांना त्रास देणे, पेट्रोल चोरणे, रात्री-अपरात्री कोणाच्याही घरात शिरुन दिसेल ते उचलणे, महिला, मुलींच्या अंगावर हात टाकण्याचे प्रकारही गणेश आणि ऋषीकेश करायचे. त्यामुळे या भागातील नागरिक तनपुरे कुटुंबाला अक्षरश: वैतागले होते.
आरोपींना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी-
आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून पोलीस कोठडीत वाढ सोमवारी संपल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी न्यायालयासमोर हजर केल.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ कोणी तयार केला. त्यातील आवाज आरोपींचा असण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे व या न्यायालयाकडे पोलीस कोठडी मागण्यात आली. न्यायालयाने आरोपींना २० ऑगस्टपर्यंत पोलीस ठेवण्यात येणार आहे.