औरंगाबाद - शहरातील संभाजीनगर येथील हनुमान चौकात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करावे, या मागणीला विरोध करणाऱ्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांंच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान पुंडलिक नगर पोलिसांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांना ताब्यात घेतले घेऊन काही वेळानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शैलेस भिसे, संतोष काळे, किरण काळे-पाटील, मनोज मुरदारे, अप्पासाहेब जाधव, शुभम केरे, कृष्णा उघडे, विजय एरंडे, अनिल शिरवत यांच्यासह आदींची उपस्थीती होती. यावेळी पोलीस आयुक्त कार्यालय विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद खताने, पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनशाम सोणवने यांच्यासह पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बाळासाहेब थोरात गुरुवारी (ता.३१) औरंगाबाद येथे आले होते. तेव्हा त्यांना पत्रकारांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या विषयावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले किमान समान कार्यक्रमात संभाजीनगरचा मुद्दा नाही, नाव बदलून विकास होत नाही. समन्वय समिती आहे, त्या समोर आले तर पाहू. आम्ही सर्वसमान कार्यक्रमांतर्गत काम करत आहोत. त्यामुळे, शहराचे नाव बदलण्यास आमचा विरोध राहणारच आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते.
महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला धडा शिकवणार -
येत्या काही दिवसात महाराष्ट्रात होणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आम्ही पाडणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षा विरोधात पत्रके छापणार असून ही पत्रके विभाग निहाय, वार्डनिहाय पसरवणा आहे.यासाठी ठिकठिकाणी बैठका देखील घेणार आहे. यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना धडा शिकवला जाईल, अशी घोषणा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केली.