औरंगाबाद - शिवसेनेत होणारे 'इन कमिंग' स्किल बेस असल्याचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जे लोक राज्याचा विकास करू शकतात, जे शिवसैनिकांसोबत राहून काम करू शकतात, अशाच लोकांना पक्षात प्रवेश देत असल्याचे त्यांनी म्हटले.
निवडणूक लढवण्यावरून अनेक चर्चा होत असल्या तरीही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. लोकांची इच्छा असेल, तर त्यांच्या इच्छेचा आदर करीन, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेनेसाठी राज्यातील सर्व मतदारसंघ सारखेच असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा - वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे लढवणार निवडणूक, अनिल परब यांचे सुचक वक्तव्य
आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून, मराठवाड्यात त्यांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी, राज्यात बेरोजगारी आणि शेतीचा प्रश्न गंभीर आहे. सध्या राज्यात फिरत असून, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली आहे अस दिसत नाही. सरकारला त्याबाबत विनंती केली असल्याचे आदित्य यांनी सांगितले.
हेही वाचा - बांगड्या भरणारे हात आता कमजोर नाहीत - आदित्य ठाकरे
औरंगाबाद महानगरपालिकेच्या कारभारावर समाधानी आहात का, या प्रश्नावर त्यांनी आपण कोणत्याही कामाबद्दल समाधान व्यक्त केलं तर ते काम थांबत; त्यामुळे कोणत्याही कामावर समाधान नसल्याचे त्यांनी म्हटले. युतीत असताना भाजप आणि सेनेची वेगळी यात्रा काढल्याबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नावर बोलताना, दोन वेगळ्या यात्रांमुळे जास्त प्रवास होत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंची यात्रा जनआशीर्वादासाठी की फडणवीस सरकारची पोलखोल करण्यासाठी?
तसेच मुख्यमंत्र्यांसोबत घरगुती संबंध आहेत, मात्र, अनेक प्रश्नांवर त्यांना निवेदन देऊन मी त्रास देत राहतो, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.