औरंगाबाद - शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या नवयुग क्रांती शिक्षक संघटनेच्या गजानन खैरे यांना पोलिसांनी बळाचा वापर करून घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड शहरात येणार असून, त्याचवेळी पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती गजानन खैरे यांनी दिली.
हेही वाचा - Hanuman Chalisa MNS Aurangabad : औरंगाबादमध्ये मनसेकडून हनुमान चालीसा पठण
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने खैरे यांनी थेट स्मशानभूमीत 2 एप्रिलपासून आंदोलन सुरू केले. आंदोलनाला 17 दिवस उलटले. या शिक्षकाची तब्येत खालावली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, आपण आंदोलनावर ठाम असून डॉक्टर देत असलेले उपचार घेणार नाही, माझ्या जिवाला काही झाल्यास अवयवदान करून याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करा, अशी विनंती या आंदोलनकर्त्या शिक्षकाने केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने खैरे यांनी चक्क शहरातील मुकंदवाडी येथील स्मशानभूमीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. ज्या अघोषित शाळा आहेत त्यांना घोषित करावे, अंशत: अनुदानित शाळांना 15 नोव्हेंबर 2011 आणि 24 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक पद्धतीने अनुदान देण्यात यावा, तसेच अंशत: अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवासंरक्षणासह समायोजन व वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या सुविधा देण्याची मागणी खैरे यांनी केली आहे. तसेच, आतापर्यंत अनेक लेखी आश्वासने मिळाली, पण त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप गजानन खैरे यांनी केला आहे. या आंदोलनाला अनेक शिक्षकांचा पाठिंबा मिळत आहे.