औरंगाबाद - गेल्या दोन महिन्यापासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे बाधितांचा आकडा रोज नवा उच्चांक गाठत आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. एप्रिल २०२० ते २०२१ या कालावधीत ३५८ कोरोनाबाधित गरोदर मातांनी उपचार घेतले. यातील १९७ महिलांची घाटीत प्रसुती झाली. सकारात्मक बाब म्हणजे यातील ९९ टक्के बाळ कोरोनामुक्त जन्मले.
वर्षभरात ३५८ बाधित गर्भवती महिलांवर उपचार-
घाटी रुग्णालयात गेल्या वर्षभरात २९२ आणि अन्य जिल्ह्यातील ६६ अशा एकूण ३५८ कोरोनाबाधित गर्भवती महिला उपचारासाठी आल्या होत्या. यातील अनेक महिला ६ ते ७ महिन्याच्या गरोदर होत्या. यातील अनेक महिला कोरोनामुक्त झाल्यानंतर घाटी रुग्णालयातून गेल्या, तर काही महिलांची खासगी रुग्णालयात प्रसुती झाली. घाटीत ३५८ पैकी १९७ महिलांची प्रसुती झाली असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.
गर्भवती महिला कोरोनाबाधित झाल्यास-
गर्भवती महिला कोरोनाबाधित झाल्यास कोणतीही चिंता करण्याची परिस्थिती नसते, ज्याप्रमाणे कोरोनाचे सामान्य रुग्ण उपचार घेत आहेत, त्याचप्रमाणे त्यांनाही उपचार घ्यावे लागतात. गरोदरपणात कोरोनाची लक्षणे जाणवल्यास वेळीच तपासणी करणे गरजेचे असते, माता आणि बाळाच्या सुरक्षेसाठी आजाराकडे दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.
बाधित महिलांच्या ९९% शिशुना कोरोनाची लागण नाही
घाटीत प्रसुती झालेल्या कोरोनाबाधित महिलांच्या ९९% नवजात शिशुना कोरोनाची लागण झाली नाही. घाटीत १९७ प्रसुती झालेल्या यात १३८ नैसर्गिक आणि ५९ महिला सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्या. या प्रसुतीनंतर केवळ ३ बाळांना कोरोनाचे निदान झाले. पाचव्या दिवशी या बाळांना कोरोनाचे निदान झाले. तर तीव्र ताप आणि रुग्णालयात उशीर झाल्याने ७ बाळाचा मृत्यू झाला.
कोरोनाची लागण तरीही नैसर्गिक प्रसूती शक्य-
गरोदरपणात कोरोनाची लागण झाली. तरीही सिझेरियन करण्याची गरज नाही. नैसर्गिक प्रसुती शक्य आहे. कोरोना स्टेज-१ मध्ये असेल तर प्रसुतीनंतर कोणताही परिणाम होत नाही. या शिवाय स्टेज 2-3 मध्ये असलेल्या गरोदर मातांचीही प्रसुती सुकर होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.