औरंगाबाद - मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या नाथसागर अर्थात जायकवाडी जलाशयातील पाणीपातळी 38.52 टक्के इतकी बाकी आहे. 31 मे रोजी याची नोंद घेतल्याची माहिती धरण अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय सध्या धरणाचे दोन्ही कालवे तसेच पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने, ही पातळी अधिक खालावण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात जायकवाडी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे यावर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याची पातळी बऱ्यापैकी राहिली होती. एरव्ही हे धरण फेब्रुवारी-मार्चमध्येच 50 टक्क्यांच्या खाली येते. मात्र, मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने यावर्षी पाणीसाठा अधिक काळ टिकला.
हेही वाचा... घरचे रागावले म्हणून दोघी मैत्रिणींनी मारली विहिरीत उडी, एक बचावली
सध्या परिसरात तापमान वाढत आहे. मागील आठवड्याभरापासून त्यात आणखीन वाढ झाली आहे. 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहचत असल्याने धरण जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन दुपटीने वाढले आहे. तसेच नियोजनानुसार कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पातळी 38 टक्क्यांवर पोहचली आहे. पाऊस लांबल्यास या पातळीत आणखी घट होणार आहे. परंतु, यावर्षी ऐन टंचाईच्या काळात कालवा आणि सिंचन योजनेत सोडलेल्या पाण्याचा चांगला फायदा धरणाच्या कार्यक्षेत्रातील ऊस, डाळिंब आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.