अमरावती - कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असतानाही परिसरातील लोकांनी अवहेलना करणे सुरुच ठेवली. अखेरीस सततच्या अवहेलनेतून आलेल्या नैराश्यामुळे एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला आहे. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार भवनात या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. सदर युवक जिल्हा मराठी पत्रकार भवन येथेच0 केअर टेकर म्हणून काम करत होता.
निखील पाटील (24) असे मृत युवकाचे नाव आहे. निखिल पाटील हा अमरावती जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे केअर टेकर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी शहरातील दसरा मैदान परिसरात राहणाऱ्या मित्रासह निखीलची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीच्या अहवालात निखीलच्या मित्राला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु, निखीलचा कोरोना चाचणी अहवाल मात्र निगेटीव्ह आला होता. असे असतानाही त्याच्या मित्राला कोरोना झाल्याने निखील धास्तावला होता. त्यातच तो राहत असलेल्या बेलपुरा परिसरातील शेजाऱ्यांनी देखील त्याला हिनवायला आणि त्याची अवहेलना करायला सुरुवात केल्याने निखील पाटील तणावाखाली होता.
हेही वाचा... सुशांत आत्महत्या प्रकरण : एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची पोलिसांकडून चौकशी
दरम्यान रविवारपासून निखील घराबाहेर पडला ते घरी परत आलाच नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान मंगळवारी बंद असणाऱ्या जिल्हा मराठी पत्रकार भवनातून दुर्गंधी येऊ लागल्याने तिथे खळबळ उडाली. याच वेळी आपला मुलगा काम करतो त्या पत्रकार भवनात मुलाला शोधायला निखीलची तिथे आई पोहोचली. दुर्गंधी येत असल्याने पत्रकार भवनाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा निखीलचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. याबाबत माहिती मिळताच शहर कोतवाली पोलीस पत्रकार भवन येथे पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केल्यावर निखीलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला.